अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ३३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बहुजन समाजाच्या न्यायहक्कासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा लढा : माजी खासदार समीर भुजबळ
येवला, दि. १ नोव्हेंबर :
महाराष्ट्रासह देशभरातील दीन, दलित आणि मागासवर्गीय बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद स्थापन करण्यात आली.आज या संस्थेच्या स्थापनेला ३३ वर्षे पूर्ण झाली असून, गेली ३३ वर्षे परिषद महाराष्ट्रासह देशभरातील बहुजन समाजाच्या न्यायहक्कासाठी अविरत कार्य करत आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह तसेच संपर्क कार्यालयात आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते.
समीर भुजबळ यांनी परिषदेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की देशभरात महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी, दिल्लीसह देशभरातील अनेक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे काम अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ नामांतरासाठीही या संस्थेने यशस्वी लढा दिला.
मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी परिषद नेहमीच प्रस्थापितांविरोधात ठामपणे उभी राहिली आणि मागासवर्गीयांना त्यांचे हक्क मिळवून दिले.
मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी तसेच जातनिहाय जनगणना करण्यासाठी गेली ३२ वर्षे परिषद सातत्याने लढा देत आहे, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, तसेच समाधान जेजुरकर, सुभाष गांगुर्डे, भूषण लाघवे, सुमित थोरात, सचिन सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, विकी बिवाल, विशाल परदेशी, नितीन आहेर, सोनाली जेजुरकर, सीमा गायकवाड, पंकज भांबरे, दीपक पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.