नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्रावर अन्याय – आ. सत्यजीत तांबे

रेल्वे प्रकल्पासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा

नाशिक, दि. १७ मे २०२६ : नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, हा निर्णय उत्तर महाराष्ट्र विशेषतः नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांवर मोठा अन्याय करणारा असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.

नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना आ. तांबे म्हणाले की, नाशिक आणि पुणे यांना सरळ रेल्वे मार्गाने जोडण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. यासाठी आंदोलन, बैठका आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र आता हा प्रकल्प रद्द झाल्याची माहिती वर्तमानपत्रांमधून मिळत आहे.

“नाशिक हे औद्योगिक प्रगतीचे महत्त्वाचे केंद्र आहे. पुण्यासोबत थेट जोडणी होणे अत्यंत गरजेचे होते. शिक्षण, रोजगार आणि उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर युवकांचा पुण्याकडे प्रवास असतो. आजही नाशिक ते पुणे प्रवासाला सहा ते सात तास लागतात. वाहतूक कोंडीमुळे अनेकदा तासन्तास वाहने अडकून राहतात,” असे त्यांनी सांगितले.

नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गाने वळसा घालण्याऐवजी थेट रेल्वे मार्ग व्हावा, अशी भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “जर हा प्रकल्प रद्द करण्यात आला असेल तर त्याचा निषेध करण्यात येईल आणि गरज पडल्यास जनआंदोलन उभारून हा प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असा इशारा आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी दिला.

चौकट –
सरळमार्गे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा –

📌 21 फेब्रुवारी 2024 – तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री (वर्तमान मुख्यमंत्री) देवेंद्र फडणवीस यांची भेट
📌 28 जून 2024 – महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश कुमार जयस्वाल यांच्याशी चर्चा
📌 9 जुलै 2024 – केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट
📌 27 फेब्रुवारी 2025 – मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा
📌 19 डिसेंबर 2025 – हिवाळी अधिवेशनात या विषयावर राज्य सरकारचं लक्ष वेधलं
📌4 मार्च 2025 :- सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कृती समितीची महत्वपूर्ण बैठक
📌21 मार्च 2025 :- अर्थसंकल्पीय अधिवेशन
📌 12 जुलै 2025 :- पावसाळी अधिवेशन
📌25 फेब्रुवारी 2026 :- अर्थसंकल्पीय अधिवेशन
📌5 मे 2026 :- मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेऊन पुणे–नाशिक सरळ मार्गे रेल्वे प्रकल्पासाठी केंद्रीय तज्ज्ञ समिती तातडीने स्थापन करण्याची मागणी केली.

“हा केवळ रेल्वे प्रकल्प नाही, तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग आहे. आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,” असा इशाराही आमदार सत्यजीत तांबे यांनी दिला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.