लढा थांबणार नाही! नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वेसाठी ९ ऑगस्टला निर्णायक जनआंदोलन- आमदार सत्यजीत तांबे

प्रशासनाच्या विनंतीवरून २९ जूनचे आंदोलन स्थगित; मात्र जनआंदोलनाची दिशा कायम असल्याचा निर्धार

मुंबई, दि. ३० जून २०२६ : नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वे प्रकल्पासाठीचा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नसून, येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने सकाळी ९ वाजता नाशिक–पुणे महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर चक्काजाम जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

२९ जून रोजी समृद्धी महामार्गावर नियोजित जनआंदोलन प्रशासनाच्या विनंतीवरून तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले. पावसाळी परिस्थिती, स्थानिक प्रशासनावरील वाढलेला ताण तसेच आगामी कुंभमेळ्याच्या तयारीची कामे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र आंदोलन स्थगित झाले असले तरी लढा थांबलेला नसून केवळ पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या सहभागातून संगमनेर, अकोले, सिन्नर, नारायणगाव, मंचर, खेड, चाकण आणि परिसरातील नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी ९ ऑगस्ट रोजी मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“हा संघर्ष केवळ नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वे प्रकल्पासाठी नाही, तर संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या हक्कांसाठी आहे. क्रांती दिनाच्या साक्षीने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या लढ्याला बळ द्यावे,” असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.

चौकट

नाशिक–पुणे सरळमार्ग रेल्वेसाठी ९ ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी जनआंदोलन करण्याचा निर्णय निश्चित झाला असून, त्याबाबत सर्व संबंधितांची प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. आंदोलनाची अंतिम रूपरेषा ठरवण्यासाठी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी, विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पुढील २–३ दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत आंदोलनाचे स्वरूप, नियोजन आणि पुढील कृती आराखड्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.