संगमनेरच्या स्वतंत्र RTO साठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पुन्हा पाठपुरावा!

परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांचा सकारात्मक प्रतिसाद; प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई |

संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) स्थापन करण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला नवी गती मिळाली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची भेट घेऊन संगमनेर, अकोले आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नव्या शासन निकषांनुसार स्वतंत्र RTO कार्यालयास मंजुरी देण्याची मागणी केली.

यावेळी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नव्या शासन अध्यादेशातील निकषांनुसार संगमनेरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रस्ताव सकारात्मकरीत्या तयार करून शासनाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले.

संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असून, वाहन नोंदणी, परवाने, कर भरणा आणि इतर परिवहन सेवांसाठी संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांना दूरवरच्या RTO कार्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याने स्वतंत्र RTO कार्यालयाची मागणी सातत्याने होत आहे.

या प्रश्नासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला आहे. २४ मार्च २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतंत्र RTO कार्यालयाची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी स्वतंत्र कॅम्प ऑफिसला मंजुरी मिळाली; मात्र ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. तसेच जुलै २०२५ च्या पावसाळी अधिवेशनातही विधान परिषदेत हा प्रश्न प्रभावीपणे उपस्थित करण्यात आला होता.

संगमनेर, अकोले आणि परिसरातील लाखो नागरिकांना अधिक कार्यक्षम, सुलभ आणि जवळच्या ठिकाणी परिवहन सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अंतिम निर्णय होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.