हक्काची रेल्वे पळवू देणार नाही’ – सुधीर मुंगसे यांचा इशारा; घारगावातून संघर्षाची हाक
घारगाव (ता. संगमनेर) येथे पुणे–नाशिक रेल्वे कृती समितीच्या वतीने खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोले आणि संगमनेर तालुक्यांची संयुक्त बैठक व पत्रकार परिषद उत्साहात पार पडली. या बैठकीत सुधीर मुंगसे यांनी पुढाकार घेत, पुणे–नाशिक रेल्वे ही संगमनेर–आळेफाटा–नारायणगाव–मंचर–राजगुरूनगर–चाकण मार्गेच व्हावी, अशी ठाम भूमिका मांडली.
यावेळी विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या मार्गासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना सुधीर मुंगसे यांनी, “रेल्वेसारखा प्रकल्प हा पुढील अनेक दशकांचा विचार करून उभारला जातो. त्यामुळे संगमनेरसह बाधित भागाच्या हक्काची रेल्वे अन्यत्र वळविण्याचा कोणताही प्रयत्न हा या परिसरातील नागरिकांवर आणि भावी पिढ्यांवर अन्याय करणारा ठरेल,” असे स्पष्ट केले.
तसेच, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या जनआंदोलनात एकत्र येण्याचे आवाहन करत, उद्योग, शेती आणि स्थानिक युवकांच्या विकासासाठी हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
“पुणे–नाशिक रेल्वे हक्काच्या मार्गानेच व्हावी, यासाठी शेवटपर्यंत संघर्ष सुरू राहील,” असा निर्धारही सुधीर मुंगसे यांनी व्यक्त केला.