नाशिक–पुणे रेल्वे राजगुरुनगर–चाकण मार्गेच व्हावी; युवा नेते सुधीर मुंगसे यांच्या पुढाकाराने ९ ऑगस्ट रोजी जनआंदोलन

राजगुरुनगर : नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्प हा राजगुरुनगर–चाकण मार्गेच मार्गी लागावा, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व युवा नेते सुधीर मुंगसे यांनी हाती घेतले असून, रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता चाकण चौक येथे नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राजगुरुनगर–चाकण हा सरळ आणि विकासाला चालना देणारा रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी स्थानिक नागरिक सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या रेल्वे मार्गामुळे शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक तसेच संपूर्ण परिसराला मोठा आर्थिक आणि सामाजिक लाभ होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दुसऱ्या मार्गाकडे वळविण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना नागरिकांमध्ये असून, यामुळे परिसराच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या रेल्वे मार्गासाठी आता सर्वांनी एकजूट होऊन आवाज उठविण्याची गरज असल्याचे युवा नेते सुधीर मुंगसे यांनी सांगितले.

“हा केवळ रेल्वे मार्गाचा प्रश्न नाही, तर आपल्या भागाच्या विकासाचा, रोजगाराच्या संधींचा आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा लढा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी एकजुटीने उभे राहावे,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.