पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सुधीर मुंगसे यांचा एल्गार; मोठ्या आंदोलनाची तयारी
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या लढ्याला आता नवे वळण मिळणार असून, युवा नेते सुधीर मुंगसे यांच्या पुढाकारातून या प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभे राहणार आहे.
राजगुरुनगर-चाकणसारखा सर्वात योग्य मार्ग मुद्दाम डावलून प्रकल्पात अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पुणे-नाशिक प्रकल्प रखडवला जात असताना अहमदाबाद-ढोलेरा सेमी हायस्पीड प्रकल्पाला गती दिली जात असल्याने केंद्र सरकारचे धोरण गुजरातधार्जिणे असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे.
युवा नेते सुधीर मुंगसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या लढ्यात माझा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. हा संघर्ष फक्त खेड तालुक्याच्या विकासासाठी, येथील तरुणांच्या भविष्याकरिता, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि उद्योग-व्यवसायाच्या प्रगतीसाठी आहे.”
या प्रकल्पामुळे खेड तालुक्यात रोजगार, उद्योग, वाहतूक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार होती. मात्र प्रकल्प थांबवल्यास सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि उद्योजकांचे मोठे नुकसान होणार असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
युवा नेते सुधीर मुंगसे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडले जाणार असून, खेड तालुक्यातील तरुण, शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या हक्काच्या विकासासाठी लढा उभारावा, असे आवाहन करण्यात आले आहे.