वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजनांची गरज – आमदार सत्यजीत तांबे.

राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य पर्यावरण दक्षता केंद्राचे चेअरमन सिद्धेश कदम यांची भेट घेत महत्त्वपूर्ण चर्चा केली. औद्योगिक क्षेत्र, शहरांमधील वाढते वायू प्रदूषण, नदी-नाल्यांचे प्रदूषण तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयांवर यावेळी सविस्तर संवाद झाला.

राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावत चालली असून ध्वनी, पाणी आणि वायू प्रदूषण गंभीर स्वरूप धारण करत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन आणि पर्यावरण विभाग यांच्यात अधिक समन्वय वाढवण्याची आवश्यकता असल्याचे आमदार तांबे यांनी यावेळी नमूद केले. तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नियमित तपासणी मोहीम आणि जनजागृती मोहिमा राबवण्यावर भर देण्यात आला.

यावेळी औद्योगिक भागांमधील प्रदूषण नियंत्रण यंत्रणांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याबरोबरच शहरांमध्ये हरित क्षेत्र वाढवणे, कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करणे आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांना प्रोत्साहन देणे या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय अत्यंत गंभीर असून यासाठी दीर्घकालीन आणि कठोर उपाययोजनांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

पर्यावरण संवर्धन आणि विकास यांचा समतोल राखत पुढील पिढीसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन स्तरावर प्रभावी पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.