शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्नांवर आमदार सत्यजीत तांबे आक्रमक; २५ मेपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पुणे :- शिक्षण विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, २५ मेपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पुणे येथे राज्याचे शिक्षण आयुक्त सुचेंद्र प्रतापसिंह यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी जवळपास ६ वाजेपर्यंत चालली. बैठकीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण संस्थांशी संबंधित अनेक प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी केवळ बैठका आणि चर्चा करून प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यावर ठोस निर्णय आणि प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे सांगितले. विशेषतः नाशिक विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.

“शिक्षण विभागातील प्रश्नांवर आता फक्त आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष निर्णय आणि त्याची अंमलबजावणी अपेक्षित आहे,” असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

गेल्या तीन वर्षांपासून आमदार तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न सातत्याने विधानपरिषदेच्या सभागृहात मांडले आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण संस्थांच्या विविध मागण्यांबाबत त्यांनी वेळोवेळी आक्रमक आणि मुद्देसूद भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच प्रशासनाशी सातत्याने संवाद, विभागीय बैठका, बैठकींचे इतिवृत्त तयार करून त्यावरील अंमलबजावणीचा आग्रह अशा विविध माध्यमांतून त्यांनी शिक्षण विभागातील प्रश्नांचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असली तरी २५ मेपर्यंत ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार सत्यजीत तांबे यांनी दिल्याने शिक्षण विभागात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.