सुधीर मुंगसे यांच्या नेतृत्वाखालील PMRDA वरील जनआंदोलनाला मोठे यश; ७६ कोटींच्या विकासकामांना मंजुरी!
ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीचे प्रमुख कार्यकर्ते सुधीर मुंगसे यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चाकण परिसरातील वाहतूक समस्यांवर मोठा दिलासा मिळाला आहे. PMRDA कार्यालयावर करण्यात आलेल्या जनआंदोलनाला अखेर यश मिळाले असून तब्बल ७६ कोटी रुपयांच्या निधीतून महत्त्वाच्या रस्ते विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
या निधीतून चऱ्होली खुर्द ते आळंदी-मरकळ रस्ता, पुणे-नाशिक महामार्गावरील आळंदी फाटा (चाकण) ते आळंदी रस्ता, कुरुळी फाटा ते निघोजे रस्ता, चिखली ते मोई रस्ता, निघोजे ते चाकण रस्ता तसेच खालुंब्रे ते MIDC फेज-२ रस्त्यांची विकासकामे मार्गी लागणार आहेत.
चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सुधीर मुंगसे यांनी ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने आंदोलन व पाठपुरावा केला. या आंदोलनात खा. डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आ. बाबाजी काळे तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. PMRDA आयुक्तालयावर धडकलेल्या या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आता ७६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
लवकरच या विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा पार पडणार असून चाकण परिसरातील वाहतूक समस्येवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.