पावसाळी अधिवेशनात आदिवासी विभागाच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक घेण्याची आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी
मुंबई : येत्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात यावी, यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, विद्यार्थी वसतिगृहे, शिष्यवृत्ती, मूलभूत नागरी सुविधा तसेच विविध विकासकामांशी संबंधित प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी बांधवांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे आमदार तांबे यांनी यावेळी नमूद केले.
येत्या पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रलंबित विषयांचा आढावा घ्यावा आणि त्यावर वेळबद्ध निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
यावर मंत्री अशोक उईके यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आदिवासी समाजाच्या विकासाशी संबंधित प्रश्नांना गती देण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, अशी भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी मांडली.