जागतिक व्यासपीठावर पाच सुवर्णपदकांची मोहोर; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून देवदत्त गुंडू यांचा गौरव

अहिल्यानगर, प्रतिनिधी : थायलंडमधील बँकॉक येथे पार पडलेल्या डब्ल्यूआरपीएफ (WRPF) आयर्न वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी करत पाच सुवर्णपदके जिंकणारे अहिल्यानगरचे पॉवरलिफ्टिंगपटू देवदत्त प्रवीण गुंडू यांचा आज प्रभा निवास येथे आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

११५ किलो वरिष्ठ गटात सहभागी झालेल्या देवदत्त गुंडू यांनी एसबीडी (SBD), पुश-पुल, ओन्ली डेडलिफ्ट, ओन्ली बेंच प्रेस आणि ओन्ली स्क्वॅट्स या पाचही प्रकारांमध्ये सुवर्णपदके पटकावत जागतिक स्पर्धेत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला.

 

यावेळी आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, “देवदत्त गुंडू यांचे हे यश केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून संपूर्ण अहिल्यानगर आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या बळावर त्यांनी जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या कामगिरीतून राज्यातील युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळेल.”

 

यावेळी देवदत्त गुंडू यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांना देत भविष्यातही देशासाठी अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.