अपक्ष आमदार सत्यजीत तांबे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पॉलिटिकल ब्रोमॅन्स ऑन डिस्पले.

अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कुजबुज, तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आलं आहे.

कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ‘फडणवीस–तांबे’ ही मैत्री नेहमीच हॉट टॉपिक ठरली आहे. कुणी त्यांना गुरु-शिष्य म्हणतं, कुणी राजकारणातील जोडगोळी नं. १, तर कुणी थेट पॉलिटिकल ब्रोमॅन्स म्हणून हसत उल्लेख करतं. काहींच्या मते तर हे समीकरण म्हणजेच फ्रेंडशिप विथ पॉलिटिकल बेनिफिट्स!

ही मैत्री चर्चेत यायला सुरुवात झाली ती तांबे यांच्या नाशिक पदवीधर निवडणुकीपासून. त्या वेळी फडणवीसांनी दिलेला “छुपा सपोर्ट” हे आजवरचं सर्वात मोठं गूढ मानलं जातं. निकाल लागल्यानंतर जाणकारांनी एकच वाक्य म्हटलं – “हा विजय फक्त अपक्षांचा नव्हता, हा राजकीय समीकरणांचा खेळ होता.”

या समीकरणाला अधिक रंग चढवला तो तांबे यांच्या CitizenVille या पुस्तक प्रकाशन सोहळ्याने. त्या वेळी फडणवीसांनी थोरातांना टोलेबाजी करत म्हटलं होतं – “तुम्ही सत्यजीतला किती दिवस पक्षाबाहेर ठेवणार? लवकर पक्षात घ्या, नाहीतर आमचाही डोळा आहे सत्यजीत वर!” हे ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला, मात्र राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली.

यानंतर विधिमंडळातील भेटी, चर्चासत्रे आणि बैठकीत या दोघांचं समीकरण ठळकपणे दिसू लागलं. शिवाय नुकत्याच झालेल्या राज्याच्या सुधारीत युवा धोरण समितीवर आणि महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर तांबे यांची नियुक्ती झाल्यानं चर्चांना आणखी उधाण आलं. अधिकृतरीत्या ही केवळ ‘निवड’ असली तरी राजकीय वर्तुळात मात्र कुजबुज – “अहो, ही निवड नाही; ही निवडलेली मैत्री आहे!”

या मैत्रीचे आणखी एक कारण असू शकते की, महायुतीतील शिंदे गटातून निवडून आलेले संगमनेरचे आमदार अमोल खताळ. आमदार खताळ आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे संबंध फारसे चांगले नसल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. अशा पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात फडणवीस–तांबे यांची मैत्री आणखी महत्त्वाची ठरते.

या सगळ्यानंतर काहींच्या मते ही फक्त व्यक्तिगत मैत्री आहे; तर काहींना वाटतं की या मागे नक्कीच नवे राजकीय खेळी दडलेल्या आहेत. याचं खरं उत्तर मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. पण एक गोष्ट नक्की – भविष्यात या मैत्रीचे राजकीय परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच जाणवतील. कारण महाराष्ट्रात नेत्यांची मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही क्षणात बदलतात; पण फडणवीस–तांबे यांचं समीकरण मात्र वेगळ्याच पातळीवर असल्याचं राजकीय वर्तुळ मान्य करतं.

म्हणूनच तर – “पक्ष बदलले तरी चालतील, विचार बदलले तरी हरकत नाही… पण फडणवीस–तांबे फ्रेंडशिप ही कायम महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्रेकिंग न्यूज राहणार आहे!”

Leave A Reply

Your email address will not be published.