वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वर्ग-४ भरतीला गती;आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश!

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वर्ग-४ पदांच्या भरती प्रक्रियेमधील अंतिम निवड यादी आणि नियुक्ती आदेश रखडल्याने हजारो उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या महत्त्वाच्या प्रश्नाची दखल घेत आमदार सत्यजीत तांबे यांनी शासन आणि संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत पात्र उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

भरती प्रक्रियेतील विलंबामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार तांबे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून अंतिम निवड यादी तातडीने जाहीर करण्याची तसेच नियुक्ती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्यानंतर भरती प्रक्रियेसंदर्भातील हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान अंतिम निवडीत स्थान मिळालेल्या एका उमेदवाराने आमदार सत्यजीत तांबे यांना पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त केली आहे. मेरिट यादी जाहीर होण्यापासून ते अंतिम निवड आणि नियुक्ती प्रक्रियेपर्यंत उमेदवारांच्या मागण्यांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांना दिलासा मिळाल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

उमेदवारांच्या हक्कासाठी केलेल्या या पाठपुराव्यामुळे भरती प्रक्रियेबाबत निर्माण झालेली अनिश्चितता दूर होण्यास मदत झाली असून, नियुक्ती प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षार्थींच्या प्रश्नांबाबत सातत्याने भूमिका घेणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांची विविध स्तरांतून दखल घेतली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.