शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारा विरोधात सत्यजीत तांबेंचा एल्गार!
नाशिक:- नाशिक विभागातील शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आता संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत आज नाशिक येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र विभागीय शिक्षण आढावा बैठकीत देण्यात आले.
आमदार सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार, प्रलंबित प्रशासकीय प्रश्न, शिक्षकांच्या अडचणी तसेच शिक्षण व्यवस्थेतील विविध त्रुटींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नाशिक विभागातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकारी सदस्य आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शिक्षण व्यवस्थेतील सुरू असलेल्या अनियमित कारभाराच्या विरोधात दि. 25 मे 2026 रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची भूमिका यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तांनी दि. 21 मे रोजी चर्चेसाठी वेळ दिली असून, त्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले.
“शिक्षण क्षेत्रातील प्रश्न प्रलंबित ठेवून चालणार नाहीत. विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत प्रत्येक घटकाला न्याय मिळालाच पाहिजे,” अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.