‘युवकांना स्वतंत्र व्यासपीठ द्या’; युवक कल्याण मंत्रालय व युवा आयोग स्थापनेची आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी
राज्यातील ५० टक्के लोकसंख्या युवकांची असताना त्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र मंत्रालय नसल्याचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित
मुंबई, दि. २३ : राज्यातील जवळपास ५० टक्के लोकसंख्या ही ४० वर्षांखालील असतानाही राज्यात अद्याप स्वतंत्र युवक कल्याण मंत्रालय अस्तित्वात नसल्यामुळे युवकांच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे लक्ष दिले जात नसल्याचा मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. स्वतंत्र युवक कल्याण मंत्रालय आणि राज्य युवा आयोग स्थापन करण्याबाबत त्यांनी प्रश्न क्रमांक ४४ द्वारे शासनाकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शासनाच्या वतीने सांगितले की, राज्यात सध्या स्वतंत्र युवक कल्याण मंत्रालय अस्तित्वात नाही. मात्र, आमदार सत्यजीत तांबे यांनी दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे स्वतंत्र युवक कल्याण मंत्रालय आणि युवा आयोग स्थापनेच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली असून त्याची दखल घेण्यात आली आहे.
प्रश्नाच्या माध्यमातून आमदार तांबे यांनी युवक कल्याण विभागाचे कामकाज कौशल्य व रोजगार विभागाशी जोडलेले असल्यामुळे युवकांच्या शिक्षण, रोजगार व उद्योजकतेच्या प्रश्नांकडे आवश्यक तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच मुद्रा व शैक्षणिक कर्जासाठी ‘सिबिल’सारख्या जाचक अटींमुळे सामान्य कुटुंबातील अनेक तरुण शासकीय योजनांपासून वंचित राहत असून त्यांच्यात असंतोषाची भावना निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत केंद्र पुरस्कृत, राज्य पुरस्कृत आणि जिल्हा नियोजन समिती पुरस्कृत विविध कौशल्य विकास योजना राबविण्यात येत आहेत. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानासह विविध योजनांद्वारे १५ ते ४५ वयोगटातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत ‘महास्वयं’ वेबपोर्टलवर नोकरी इच्छुकांची नोंदणी केली जात असून रोजगार मार्गदर्शन केंद्रांचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी २८ मे २०२५ रोजी क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. बैठकीतील निर्देशानुसार सहा उपसमित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांचे कामकाज सध्या प्रगतीपथावर असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उत्तरातून दिली.
स्वतंत्र युवक कल्याण मंत्रालय आणि युवा आयोगाच्या स्थापनेबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा, युवकांच्या शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रश्नाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित केली. त्याचबरोबर शासनाचा सकारात्मक प्रतिसाद पाहून आभार मानले.