शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा; मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी सविस्तर चर्चा
मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन त्यांना दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
बैठकीत सन २०१९ पासून रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेचा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात आला. पदोन्नती प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागत असून, पदोन्नतीतील सर्व अडथळे दूर करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांसाठी स्वतंत्र पदसंख्येला मान्यता देण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या निर्णयामुळे शिक्षकांची कमतरता दूर होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी असलेल्या विद्यमान गुणांकन पद्धतीत सुधारणा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. प्रत्यक्ष अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना योग्य न्याय मिळावा आणि पुरस्कार प्रक्रिया अधिक पारदर्शक व वस्तुनिष्ठ व्हावी, यासाठी आवश्यक बदल करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय २६ सप्टेंबर २०२३ पूर्वी पदोन्नती मिळालेल्या मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना पदोन्नती वेतनतफावत लागू करण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. या निर्णयामुळे संबंधित अधिकारी व शिक्षकांवरील अन्याय दूर होण्यास मदत होणार असल्याचे नमूद करण्यात आले.
या सर्व विषयांवर मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली. राज्यातील शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन स्तरावर लवकरच ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.