मोदी-फडणवीसांच्या आवाहनाला आमदार सत्यजीत तांबे यांची कृतीतून साथ ; जिल्हा नियोजन समितीची बैठकीत ऑनलाइन सहभाग!
अहिल्यानगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, अनावश्यक प्रवास टाळणे आणि शक्य तितक्या कामांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर वाढवण्याचे केलेले आवाहन तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्यावर दिलेला भर याची प्रभावी अंमलबजावणी आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवली.
अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या बैठकीत सत्यजीत तांबे यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेत केवळ शासनाच्या सूचनांचे पालनच केले नाही, तर आधुनिक आणि जबाबदार कार्यपद्धतीचा आदर्शही समोर ठेवला.
सध्या देशभरात इंधन बचत, वाहतुकीवरील ताण कमी करणे आणि “वर्क फ्रॉम होम” संस्कृतीला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. अशा वेळी अनेक लोकप्रतिनिधी केवळ आवाहनांपुरते मर्यादित राहत असताना, सत्यजीत तांबे यांनी मात्र त्याची थेट अंमलबजावणी करून दाखवल्याची चर्चा होत आहे.
ऑनलाइन बैठकीमुळे वेळ, ऊर्जा आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होते. अनावश्यक प्रवास टाळल्यामुळे प्रशासनिक कामकाज अधिक वेगवान आणि परिणामकारक बनते. विशेष म्हणजे, डिजिटल माध्यमातूनही विकासकामांबाबत तितक्याच प्रभावीपणे चर्चा होऊ शकते, हे या बैठकीतून पुन्हा अधोरेखित झाले.
तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्याच्या दृष्टीने सत्यजीत तांबे यांनी घेतलेली भूमिका सकारात्मक मानली जात आहे. बदलत्या काळानुसार कामकाजाच्या पद्धतीत बदल स्वीकारणे आवश्यक असून, लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घेतल्यास त्याचा चांगला संदेश समाजात जातो, असे मतही व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, “इंधन वाचवा, वेळ वाचवा आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करा” हा संदेश आता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची गरज असताना, सत्यजीत तांबे यांनी ऑनलाइन बैठकीतून त्याची प्रभावी सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.