जल जीवन मिशनच्या रखडलेल्या कामांवर आमदार सत्यजीत तांबे आक्रमक!
मुंबई : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणींवर चर्चा करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सत्यजीत तांबे यांनी जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या योजनांच्या रखडलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित केला.
अनेक गावांमध्ये योजना मंजूर असूनही पाणीस्रोत निश्चित न झाल्यामुळे तलावांची कामे सुरू होऊ शकलेली नाहीत, तर काही ठिकाणी पाईपलाईनचे काम रखडले आहे. काही ठिकाणी वर्क ऑर्डर होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे तांबे यांनी निदर्शनास आणून दिले. पाण्यासारख्या मूलभूत गरजेच्या कामात होणारा विलंब हा गंभीर विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सर्व मुद्द्यांवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते.