येवला मतदारसंघातील विद्युत प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे छगन भुजबळ यांचे निर्देश

कृषी आकस्मिकता निधीतील व सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत प्रलंबित विद्युत प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याबरोबरच, शहरातील धोकादायक वीज वाहिन्यांच्या भूमिगतकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे छगन भुजबळ यांचे आदेश

येवला,दि.१६ मे :- येवला मतदारसंघात एसीएफ अर्थात कृषी आकस्मिकता निधीतील विद्युत उपकेंद्रांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत मंजूर असलेली कामे तातडीने सुरु करा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्याचे माजी छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघात एसीएफ अर्थात कृषी आकस्मिकता निधीतून सुरु असलेल्या येवला तालुक्यातील अंगुलगाव 5 MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र,बल्हेगाव 5 MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र तसेच निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव विद्युत उपकेंद्र 5 MVA चे अतिरीक्त रोहीत्र बसविणे, मरळगोई खु.विद्युत उपकेंद्र 5 MVA चे अतिरिक्त रोहित्र बसविणे या कामांचा आढावा घेऊन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून सुरु करण्यात यावे अशा सूचना दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत येवला शहर येथे 5 MVA ऐवजी 10 MVA चे रोहित्र बसविणे कामाचा आढावा घेतला. तसेच आरडीएसएस योजनेअंतर्गत सुरु असलेल्या येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहत येथे 5 MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र,कुसूर येथे 5 MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र, सोमठाण देश येथे 2 X 5 MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र कोटमगाव विद्युत उपकेंद्राची क्षमता 10 MVA करणे, सावरगाव 5 MVA चे अतिरिक्त रोहीत्र बसविणे, पिंपळगाव जलाल 5 MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र,जऊळके 5 MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र सुरू करणे या कामांचा आढावा घेत कामे सुरु करण्याच्या सूचना केल्या.

तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निफाड तालुक्यातील भरवस फाटा दहेगाव येथे 5 MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र करणे,विंचूर 5 MVA विद्युत उपकेंद्रातील रोहित्राची क्षमता 10 MVA करणे, कानळद 5 MVA विद्युत उपकेंद्रातील रोहित्राची क्षमता 10 MVA करणे, देवगाव 3.15 MVA विद्युत उपकेंद्रातील रोहित्राची क्षमता 10 MVA करणे,ही कामे तातडीने सुरु करण्यात यावी अशा सूचना केल्या. वाहेगाव/ दहेगाव (भरवस) येथील दीड एकर सरकारी जमीन विद्युत उपकेंद्रासाठी तातडीने हस्तांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्या.

त्याचबरोबर खेडलेझुंगे 5 MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र सुरू करणे, कोळगाव ता.येवला येथे 5 MVA चे विद्युत उपकेंद्र सुरू करणे या कामांचा प्रस्तावित आरडीएसएस योजनेत समावेश करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच कोटमगाव आणि गवंडगाव विद्युत उपकेंद्रात ३३ केव्ही लाईन टाकणे, १३२ केव्ही येवला येथे 2×15 MVAR अतिरिक्त रोहित्र बसविणे, धामणगाव ता.येवला येथे 132 KV अतिउच्चदाब उपकेंद्र (EHV-Substation)निर्माण करण्यासाठी महापारेषणला प्रस्ताव पाठविण्यात यावेत तसेच पावसाळी पूर्व कामे पूर्ण करून कुठलीही दुर्घटना होणार नाही याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, येवला शहरातील प्रमुख रस्त्यांवरील विद्युत वाहिन्या या अतिशय धोकादायक स्थितीत असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनवून शासनास पाठविण्याच्या सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील कार्यालयात येवला मतदारसंघातील महावितरणच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,नाशिक अधीक्षक अभियंता राजेश थूल, मालेगाव मंडळाचे कार्यकारी अभियंता जगदीश इंगळे, महावितरण पायाभूत सुविधा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र ढोबळे,कार्यकारी अभियंता व्ही.के.काळूमाळी, कार्यकारी अभियंता संजय तडवी यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.