संगमनेर नगरपालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘जेटिंग कम सक्शन’ मशीन; नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते लोकार्पण!

संगमनेर: शहराच्या वाढत्या विस्तारासोबतच ड्रेनेज आणि स्वच्छता व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेऊन, संगमनेर नगरपालिकेने स्वच्छतेच्या दिशेने एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत संगमनेर नगरपालिकेला भुयारी गटार स्वच्छतेसाठी अत्यंत अत्याधुनिक आणि भव्य क्षमतेचे “Jetting with Suction Machine” (जेटिंग कम सक्शन मशीन) प्राप्त झाले आहे. नुकतेच संगमनेरच्या नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते या नव्या वाहनाचे पूजन करून ते शहराच्या सेवेत दाखल करण्यात आले.

हे मशीन ४,००० लीटर जेटिंग आणि ४,००० लीटर सक्शन अशा एकूण ८,००० लीटरच्या अवाढव्य क्षमतेचे आहे. यातील जेटिंग क्षमतेमुळे तीव्र पाण्याच्या प्रेशरने ड्रेनेजमधील कचरा आणि साचलेली घाण वाहून लावणे सोपे होणार आहे, तर सक्शन क्षमतेमुळे गटारातील सांडपाणी, चिखल आणि इतर कचरा वेगाने खेचून घेता येणार आहे. शहरातील मोठ्या आणि गुंतागुंतीच्या ड्रेनेज लाईन्स स्वच्छ करण्यासाठी हे डबल पॉवर मशीन अत्यंत उपयुक्त ठरणार असून, यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे श्रम आणि वेळ दोन्हीची मोठी बचत होणार आहे.

शहराचा विस्तार ज्या गतीने होत आहे, त्या प्रमाणात स्वच्छता व्यवस्थेवरही मोठा ताण येत आहे. अनेकदा गटार तुंबणे, अस्वच्छता पसरणे आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अशा परिस्थितीत हे अत्याधुनिक मशीन संगमनेरच्या स्वच्छता व्यवस्थेला एक मोठी ताकद देणारे ठरेल. यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि सुरक्षित पद्धतीने भुयारी गटारांची स्वच्छता करणे शक्य होणार असून, नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे.

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले की, शहराचा विस्तार लक्षात घेता स्वच्छता व्यवस्था अधिक आधुनिक करणे ही काळाची गरज होती. हे मशीन संगमनेरच्या स्वच्छता मोहिमेला मोठी गती देईल. नागरिकांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार सोयी-सुविधा देण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. संगमनेर शहराच्या स्वच्छतेसाठी आणि विकासासाठी ही महत्त्वाची मदत दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.