मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार सत्यजीत तांबे यांच्यात विकासकामांवर सविस्तर चर्चा!
मुंबई : राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. सिन्नर येथील एमआयडीसी क्षेत्रातील वाढलेले जमिनीचे दर, संगमनेर परिसरातील वीजपुरवठ्याच्या समस्या तसेच पुणे-नाशिक सरळ मार्गे रेल्वे प्रकल्पाचा मुद्दा या बैठकीत प्राधान्याने मांडण्यात आला.
सिन्नर एमआयडीसी परिसरात जमिनीच्या दरवाढीमुळे लघुउद्योगांवर वाढत असलेल्या आर्थिक भाराबाबत तांबे यांनी लक्ष वेधले. तसेच संगमनेर शहर व तालुक्यात कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार खंडित होणारी सेवा आणि जीर्ण यंत्रणेमुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणींबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. याशिवाय पुणे-नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार केंद्रीय तज्ज्ञ समिती लवकरात लवकर स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाशी समन्वय साधण्याची मागणी करण्यात आली.
या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून मुख्यमंत्री महोदयांनी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD) मा. लोकेश चंद्र हे देखील उपस्थित होते.