नाशिकच्या वावी ट्रॉमा केअर सेंटरला निधी अभावी खो!
कुंभमेळ्यापूर्वी किमान तात्पुरती व्यवस्था करा; आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी
मुंबई, दि. १० जुलै २०२६ : शिर्डी मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील वावी येथे प्रस्तावित ट्रॉमा केअर सेंटरचा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधानपरिषदेत उपस्थित केला. अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडल्याने भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रश्न उपस्थित करताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, वावी ट्रॉमा केअर सेंटरला यापूर्वी विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. नाशिक-मुंबईहून शिर्डीकडे जाणाऱ्या लाखो भाविकांच्या पायी दिंड्या, पदयात्रा आणि वाहनांची मोठी वर्दळ या मार्गावर असते. वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये जखमींना तातडीने उपचार मिळत नसल्याने जीवितहानी होते. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, वावी येथील काम मंजूर आहे, मात्र आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने राज्यात आणि या भागात आधीच खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सध्या उपलब्ध निधीचा प्राधान्याने त्या प्रकल्पांसाठी वापर होत आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी मंजूर झालेली ही मोठी कामे पूर्ण झाल्यानंतरच वावीच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या कामाला गती देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भातील चर्चा दरम्यान आमदार सत्यजीत तांबे हे मतदारसंघातील आणि जनहिताचे प्रश्न किती चिकाटीने मांडतात, याचा विशेष उल्लेख आरोग्यमंत्र्यांनी केला. या गंभीर प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी म्हणून तांबे यांना किती आत्मियता व गांभीर्य आहे, हे त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यावरून स्पष्ट होते, अशा शब्दांत मंत्र्यांनी त्यांच्या सजगतेचे कौतुक केले.
मंत्र्यांच्या उत्तरानंतर तांबे यांनी कुंभमेळ्याच्या काळात आणि शिर्डीकडे जाणाऱ्या पायी दिंड्यांचा विचार करून वावी येथे निदान तात्पुरती आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका व आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. भाविकांची सुरक्षा आणि अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी, यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
आमदार सत्यजीत तांबे यांच्या सूचनेची दखल घेत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या तात्पुरत्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन योग्य निर्णय घेईल, असे आश्वासन सभागृहात दिले.