सुधीर मुंगसे यांच्या नेतृत्वाला मोठे यश; कुरुळीच्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर विजय

खेड) : प्रतिनिधी

 

खेड तालुक्यातील कुरुळी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या एकजुटीला अखेर मोठे यश मिळाले असून प्रस्तावित तळेगाव–उरुळी कांचन रेल्वे मार्गाचे अलाइनमेंट बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या आंदोलनात खेड तालुक्याचे युवा नेते सुधीर मुंगसे यांनी सुरुवातीपासून सक्रिय नेतृत्व करत शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडल्याने या लढ्याला निर्णायक दिशा मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 

प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे कुरुळीसह परिसरातील सुपीक बागायती जमीन, शेकडो कुटुंबांची घरे आणि हजारो नागरिकांचे भवितव्य धोक्यात येणार होते. या विरोधात ग्रामस्थांनी एकजुटीने आंदोलन छेडले. या आंदोलनात सुधीर मुंगसे यांनी प्रत्येक बैठकीत, आंदोलनात आणि चर्चेत सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांना ठाम पाठिंबा दिला.

 

रेल्वेच्या प्रस्तावित अलाइनमेंटमुळे होणारे गंभीर परिणाम त्यांनी रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांसह खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे आणि संबंधित लोकप्रतिनिधींसमोर प्रभावीपणे मांडले. हा प्रश्न केवळ रेल्वे मार्गाचा नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा, शेतीचा आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा असल्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली.

 

आंदोलनादरम्यान सुधीर मुंगसे यांनी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याच लोकएकजुटीमुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि अखेर रेल्वे मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

या निर्णयामुळे कुरुळी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, हा विजय लोकशक्ती, शेतकऱ्यांची एकजूट आणि युवा नेते सुधीर मुंगसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. हक्कासाठी एकजुटीने लढल्यास यश निश्चित मिळते, हे या आंदोलनाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.