महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये मेगा भरतीची घोषणा: 5,500 प्राध्यापक व 2,900 कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती
आमदार सत्यजीत तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शैक्षणिक संस्थांतील रिक्त पदांच्या भरतीसाठी मोठा निर्णय
मुंबई, २६ जुलै : महाराष्ट्रातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये दीर्घकाळापासून चालत आलेल्या मनुष्यबळाच्या तुटवड्याच्या समस्येला शासनाच्या स्तरावरून मोठ्या प्रमाणात तोंड द्यायचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, लवकरच राज्यातील विद्यापीठांमध्ये ५,५०० प्राध्यापक आणि २,९०० कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे.
या निर्णयामागे विधानपरिषद सदस्य सत्यजीत तांबे यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या २ जुलै २०२५ रोजी पावसाळी अधिवेशनात त्यांनी या विषयावर प्रश्न विचारून शासनाचे लक्ष वेधले होते. तांबे यांनी सभागृहात मांडले की, विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागांबाबत UGC ने सहाव्यांदा पत्र पाठवले असून, ३१ जुलै २०२५ पर्यंतची अंतिम मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती.
तांबे यांचा पाठपुरावा
सत्यजीत तांबे यांच्या या मागणीला शासनाने गंभीरतेने घेतले आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू केली आहे. तांबे यांनी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “या भरती प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल, रिक्त पदांमुळे शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील, शैक्षणिक दर्जा उंचावेल आणि विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होईल.”
शैक्षणिक क्षेत्रातील मोठी गरज भागवणारा निर्णय
या मेगा भरती प्रक्रियेमुळे राज्यातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित होईल. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे अनेक महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम चालविण्यास अडचणी येत होत्या, त्यावर यामुळे मात होणार आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते, हा निर्णय उच्चशिक्षणाच्या गुणवत्तेत महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणणारा ठरेल.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि कालबद्ध पध्दतीने पूर्ण करण्यावर विभागाचे लक्ष केंद्रित आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भरतीमुळे विद्यापीठ स्तरावरील शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल.
शैक्षणिक क्षेत्रातील या मोठ्या बदलाचे श्रेय विधानपरिषद सदस्य सत्यजीत तांबे यांच्या सातत्याच्या प्रयत्नांना दिले जात आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. आता प्रश्न आहे तो फक्त या भरती प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण होतील की नाही हा. शासनाकडून याबाबत सकारात्मक आश्वासन आले असून, सर्वच पक्षांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच घटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिन्हीही घटकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगत आहेत. राज्यातील उच्चशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.