पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी; सर्वपक्षीय बैठकीत सत्यजीत तांबे यांची ठाम भूमिका
मुंबई | प्रतिनिधी
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्वनियोजित संगमनेर–अकोले–आळेफाटा–नारायणगाव–मंचर–राजगुरुनगर–चाकण या सरळ मार्गानेच राबवावा, अशी ठाम मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळातील सर्वपक्षीय बैठकीत केली.
जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत तांबे यांनी सांगितले की, या प्रकल्पाचा मूळ उद्देश साध्य करायचा असेल तर रेल्वे पूर्वनियोजित सरळ मार्गानेच जाणे आवश्यक आहे. शिर्डी–अहिल्यानगर मार्गे वळवून संगमनेर परिसरावर अन्याय होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
तसेच, नाशिक–शिर्डी आणि अहिल्यानगर–पुणे रेल्वे प्रकल्पांनाही आपला विरोध नसून, तेही लवकरात लवकर मार्गी लागावेत, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. मात्र, त्यासाठी पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ सरळ मार्ग बदलला जाऊ नये, यावर त्यांनी भर दिला.
शेतकरी, विद्यार्थी, युवक, उद्योजक तसेच उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या व्यापक हितासाठी सर्व रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करत, सरळ मार्गासाठी सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहितीही तांबे यांनी दिली. “हा प्रकल्प मार्गी लागेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस मंत्री दिलीपराव वळसे पाटील, मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे, प्राजक्त तनपुरे, बाबाजी काळे, शरद सोनवणे, अमोल खताळ, अक्षय कर्डिले यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.