पद्मश्री रघुवीर खेडकर यांचे संगमनेरमध्ये जल्लोषात स्वागत; “हा तमाशा क्षेत्रातील प्रत्येक कलावंताचा सन्मान,” आमदार सत्यजीत तांबे यांचे गौरवोद्गार
लोककलेचा सन्मान करत संगमनेरने जपली आपल्या मातीतल्या कलेची परंपरा
संगमनेर, दि. २७ मे २०२६ : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘तमाशा महर्षी’ रघुवीर खेडकर यांचे संगमनेरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संगमनेर नगराध्यक्षा मैथिली तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“पद्मश्री हा फक्त रघु भाऊंचा सन्मान नाही, तर तमाशा क्षेत्रात आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या प्रत्येक कलावंताच्या संघर्षाचा आणि कलेचा गौरव आहे,” असे गौरवोद्गार आमदार तांबे यांनी यावेळी काढले.
संगमनेरचा पहिला पद्मश्री म्हणून रघुवीर खेडकर यांनी शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा मान उंचावल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबाने जपलेली माणुसकी, ऋणानुबंध आणि लोककलेशी असलेली नाळ यांचाही यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
लोककलेला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान तमाशा आणि लोककला क्षेत्रासाठी नव्या उर्जेचा आणि अभिमानाचा क्षण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.