सत्यजीत तांबे यांची उद्योग राज्यमंत्री पदी वर्णी लागणार?
युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारची चाल?
मुंबई- नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांची राज्य मंत्रिमंडळात उद्योग राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती आहे. सत्यजीत तांबे युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असून सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी ज्याप्रकारे युवकांच्या रोजगाराच्या, उद्योगनिर्मितीच्या मुद्द्यांना हात घातला, त्यावरून सरकारने त्यांच्यातील ‘स्पार्क’ हेरला असल्याची चर्चा आहे.
सत्यजीत तांबे उद्योग राज्यमंत्री झाल्यास याचा राज्यभरातील युवावर्गावर सकारात्मक परिणाम होईल, परिणामी आगामी निवडणुकांमध्ये सरकारला देखील याचा फायदा होईल. तांबे यांनी आजवर काँग्रेसमध्ये काम केलं असलं तरी पक्षभेद, पक्षाच्या सीमांच्या पलीकडे जात त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी चांगला संबंध ठेवला आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यांचा संपर्क उत्तम आहे. तसेच सध्या राज्याच्या उद्योग क्षेत्रात अनेक उलथापालथी सुरु असून सरकार स्थापन झाल्यापासूनच यावरून राजकारण तापलेले आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्यासारखा जाणकार व हुशार युवा नेता हे सर्व शांततेने, वेगळ्या पद्धतीने हाताळू शकेल आणि सरकारचा ‘तारणहार’ ठरू शकेल असा विश्वास सत्ताधारी पक्षातील नेत्यांना वाटतोय. जेणेकरून या विषयावरून तापलेलं वातावरण कमी करण्यास त्यांची नक्कीच मदत होऊ शकेल.
उद्योग व रोजगारनिर्मिती या विषयावर विरोधकांकडून सातत्याने सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले जात आहे, विधिमंडळात कोंडीत पकडलं जातंय. तांबे या सर्व प्रश्नांना यशस्वीपणे हाताळू शकतील, हीच भावना राज्यातील युवकांमध्येही असल्याचे दिसते आहे. कारण हे दोन्ही विषय त्यांच्या आवडीचे व जिव्हाळ्याचे असून आपल्या अभिनव संकल्पना त्यांनी वेळोवेळी मांडलेल्या दिसून आल्या. तसेच सरकारच्या धोरणांवर टीका करत असतानाच सरकारने यावर काय पावले उचलली पाहिजेत याबद्दलही ते सध्या विधिमंडळात अतिशय प्रभावीपणे आपले म्हणणे मांडत आहेत. उद्योग क्षेत्र, तसेच रोजगारनिर्मिती संदर्भातील त्यांच्याकडे चांगल्या संकल्पना, योजना आहेत.
एकनाथ शिंदेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. फडणवीस देखील याबाबत सकारात्मक असून आमदार तांबे यांनाही याबद्दल विचारणा करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. तांबे यांचे मामा व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील असे झाल्यास कोणतीही हरकत नसल्याचे म्हटले आहे. सत्यजीत तांबे अपक्ष निवडून आले असल्याने याबद्दल कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नसल्याचे देखील त्यांनी म्हटल्याची माहिती आहे.
कोणत्याही पक्षात सामील न होता त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा आहे. उद्योग खात्याबद्दल असलेले नकारात्मक वातावरण बघता सध्या कोणीच या खात्याची जबाबदारी घेण्यास उत्सुक नसल्यामुळे भाजप व शिवसेना पक्षातीलही कोणालाच याबद्दल काही हरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे असे घडण्याची शक्यता बळावली आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान तांबे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची चिन्हे आहेत.