भुजबळांनी जागवल्या अण्णासाहेब पाटील यांच्या आठवणी!
माथाडी कामगार चळवळीचे जनक स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त छगन भुजबळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
नाशिक- २५ सप्टेंबर २०२४:
माथाडी कामगार चळवळीचे जनक असलेले झुंजार नेते अण्णासाहेब पाटील यांची आज जयंती आहे. यानिमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अण्णासाहेब पाटील यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण छगन भुजबळ आणि अण्णासाहेब पाटील हे खूप जवळचे मित्र होते. भुजबळ माझगाव परिसरात राहत असताना पाटील देखील त्यांच्या घरापासून जवळ राहायला होते. दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती.
याबद्दल भुजबळांनी सविस्तर पोस्ट लिहून पहिल्यांदाच त्यांच्या या आठवणींना उजाळा दिला आहे. “मी अतिशय जवळून पाहिलेला कष्टकऱ्यांचा सच्चा कैवारी….. स्व. अण्णासाहेब पाटील!” या शीर्षकाने सुरू होणाऱ्या त्यांच्या आजच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आठवणी सविस्तर मांडल्या आहेत.
ते म्हणतात, “माझगावात आमचं घर जवळजवळच होतं. डॉ. तोरस्कर, अण्णासाहेब आणि मी, आम्ही तिघेजण खूप जवळचे मित्र होतो. अर्थात अण्णासाहेब माझ्यापेक्षा वयाने मोठे होते! तेव्हा ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्या दरम्यान मी सक्रिय राजकारणात उतरून शिवसेनेतून महानगरपालिका निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. तेव्हा अण्णासाहेब स्वतः काँग्रेसचे नेते असूनही दररोज सकाळी सकाळी सगळ्या माझगावात फिरून “भुजबळला मत द्यायचं, भुजबळला मत द्यायचं” म्हणून लोकांना सांगत असत. माझगावात तेव्हा खोका बाजार, लकडा बाजार वगैरे माथाडी कामगारबहुल भाग होते. या भागांमध्ये अण्णासाहेबांच्या शब्दाला खूप मान होता. त्या भागात ते अक्षरशः माझा प्रचारच करायचे, इतकी आमची जवळीक होती.”
“माथाडी कामगारांमध्ये त्यांच्या शब्दाला हा मान असण्याचं कारण म्हणजे या कष्टकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी तन-मन-धन अर्पण करून काम केलं. माथाडी कामगार कायदा मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. हे प्रयत्न मला जवळून बघता आले, किंबहुना मलाही त्यात खारीचा वाटा उचलता आला, हे मी माझं भाग्य समजतो.”
माथाडी कामगार कायद्याबद्दलच्या अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाबद्दलही ते लिहितात. “त्यावेळी मुंबईत जुनं विधानभवन होतं. माथाडी कायद्यासाठी अण्णासाहेब पाटील आणि तत्कालीन विधानपरिषद सदस्य आ. तुषार पवार, ॲड. वळवईकर हे वकील अशा सर्वांचे एकत्रित प्रयत्न चालू होते. प्रत्येक वेळेला, माथाडी कायद्याचा विषय अजेंड्यावर आहे म्हणून आम्ही त्या जुन्या विधानसभेत जाऊन बसायचो. तेव्हा आमच्यासारख्या नवख्यांना विधानसभेच्या कामकाजाबद्दल फारसं काही माहिती नव्हतं. आज अजेंड्यावर आहे म्हणजे ते येणारच असं वाटायचं, पण यायचंच नाही. रोज हे विधेयक पुढे पुढे ढकलत होतं. पण अण्णासाहेबांनी हार मानली नाही. अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांतून ५ जून १९६९ रोजी माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आला. आ. तुषार पवार, ॲड. वळवईकर अशा आपल्या खास माणसांच्या साथीने अविरत लढा देऊन अण्णासाहेबांनी हा कायदा प्रत्यक्षात आणला. माथाडी कामगारांसाठी कायदा करण्याचे पूर्ण प्रयत्न आणि संपूर्ण यश निर्विवादपणे त्यांचंच आहे. हा संपूर्ण प्रवास मी जवळून पाहिला.”
याबरोबरच तेव्हाची रुग्णालयात एकाच वेळी दाखल असतानाची आठवण देखील त्यांनी सांगितली आहे. “अण्णासाहेबांशी माझे अगदी घरगुती संबंध होते. भायखळ्याच्या मसिना हॉस्पिटलमध्ये माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. त्यांनाही अपेंडिक्सचा त्रास होता. त्यामुळे त्यावेळी माझ्या सोबत त्यांनी देखील मसिना हॉस्पिटलमध्येच त्यांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करून घेतलं. त्या हॉस्पिटलमध्ये कर्नल भरूचा म्हणून अत्यंत कडक शिस्तीचे डॉक्टर होते. आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना तेव्हा सोबत टेपरेकॉर्डर असायचा, विरंगुळा म्हणून आम्ही ऐकायचो. पण कर्नल भरूचा आल्यावर टेपरेकॉर्डर त्यांच्या नजरेला पडल्यावर ते तो थेट दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून द्यायचे. यावर आम्ही जरा हळहळायचो, पण कर्नलच्या शिस्तीसमोर आमचे काही चालत नसे. अशा आमच्या अनेक गमतीदार आठवणी आहेत.”
भुजबळांनी ठेवल्या होत्या अण्णासाहेब पाटील यांच्यासारख्या पिळदार मिशा!
याबद्दल लिहिताना ते म्हणतात, “साताऱ्याहून आलेल्या या रांगड्या व्यक्तिमत्वाचा माझगावमधील तरुणांवर जबरदस्त प्रभाव होता. याला मी देखील अपवाद नव्हतो. त्या काळात अण्णासाहेबांप्रमाणे मी देखील आकडेबाज मिशा वाढवल्या होत्या. त्या अण्णासाहेबांप्रमाणेच कडक, पिळदार ठेवण्यासाठी माझा प्रयत्न असायचा. अगदी माझ्या लग्नाच्या वेळी देखील माझ्या मिशा तशाच होत्या. नंतर मुंबईच्या महापौर पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर लोकसेवेच्या दृष्टीने व्यक्तिमत्वात बदल करणं भाग पडलं.”
माथाडी कामगारांसाठीचं पाटील यांचं काम किती निष्ठेने होतं याबद्दलची त्यांनी वर्णन केलं आहे. “त्यांचं माथाडी कामगारांसाठीच्या संघटनेचं काम कडक शिस्तीत चालत असे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कोणालाही भिडायला तयार असायचे. त्यामुळे त्यांचा चांगलाच वचक होता, हे जवळून पाहिलंय. कामगारांच्या हिताशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही, कामगारांशी ते अतिशय प्रामाणिक राहिले आयुष्यभर! त्यामुळेच ते अतिशय लोकप्रिय होते. त्यांचा हा सच्चेपणा, आक्रमकपणा समाजासाठी काम करताना मला देखील मार्गदर्शक ठरला.”
“अण्णासाहेब पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू व्यक्तिगत माझ्यासाठी खूप धक्कादायक होता. जवळच्या मित्राचं असं जाणं मनाला मोठा चटका लावून गेलं.” असं म्हणत पोस्टचा अगदी भावुक शेवट करत त्यांनी पाटील यांना आदरांजली वाहिली आहे.