प्रतिनिधी, जुन्नर
आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले शिवनेरी येथे श्रमदान मोहीमेसोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. कार्यक्रमाचे आयोजन आमदार सत्यजीत तांबे मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. यावेळी किल्ले शिवनेरी येथे आ. सत्यजीत तांबे यांनी हजारो तरुणांना सोबत शिव कार्याची शपथ घेतली. आज पासून शिव कार्यासाठी वचनबद्ध असल्याचे यावेळी आ. तांबेंनी सांगितले.
स्वराज्याचे पाईक म्हणून या विचारांचे जतन करणे हे आपले सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे. कर्तव्यपूर्तीचा हा प्रयत्न अधिक प्रभावी व शाश्वत ठरावा यासाठी संघटित शिवकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच या शिवकार्यासाठी आज मी वचनबद्ध होत आहे, अशी शपथ आ. सत्यजीत तांबे आणि त्यांच्या मित्र परिवाराने घेतली. वाढदिवसानिमित्त होणाऱ्या श्रमदानासाठी राज्यातून हजारोंच्या संख्येने तरुण – तरुणी किल्ले शिवनेरी येथे आले होते. यावेळी किल्ले शिवनेरीवर सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत स्वच्छता व श्रमदान अभियान राबविण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सांगणारे नाटक व पोवाडे सादर केले गेले. किल्ले शिवनेरीवर उपस्थित हजारो युवक स्वच्छता व श्रमदानाचा महासंकल्प घेऊन पुढे देखील काम करणार असल्याचे आ. सत्यजीत तांबे मित्र परिवाराकडून सांगण्यात आले.
हा अभिनव उपक्रम नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी असून या स्वच्छता व श्रमदान अभियानात राज्यभरातील हजारो युवक व युवतींनी मोठा सहभाग नोंदवला. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी हे संबंध महाराष्ट्राचे ऊर्जास्थान आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त या ऊर्जास्थानी जाऊन विचार मंथन करूया, श्रमदान करूया अशी संकल्पना माझ्या मित्र परिवाराने मांडली. ही संकल्पना मला खूपच आवडल्याने मी याला तत्काळ होकार दिल्याचे आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.