संगमनेर बस स्थानक परिसरातील प्रश्नांवर आमदार सत्यजीत तांबे यांची परिवहन मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा, पार्किंग, स्वच्छता, दिव्यांग गाळे व शिस्तबद्धता याबाबत मागण्या; मंत्री प्रताप सरनाईक यांचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई, 2 फेब्रुवारी: आमदार सत्यजीत तांबे यांनी आज महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन संगमनेर बस स्थानक परिसराशी संबंधित विविध महत्त्वाचे प्रश्न मांडले.

विमानतळाच्या दर्जाचे, अत्याधुनिक बस स्थानक उभारल्यानंतरही परिसरातील काही मूलभूत विषयांवर तातडीने उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे आमदार तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी संगमनेर बस स्थानक परिसरात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच बस स्थानक परिसरात होणारे सार्वजनिक कार्यक्रम व अनधिकृत फ्लेक्स यांना पायबंद घालण्याचा निर्णय संगमनेर नगरपालिकेने घेतला असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागानेही स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

बस स्थानकातील पार्किंग व्यवस्था तातडीने सुरू करावी, अतिक्रमणांवर नियमांनुसार कारवाई करावी, तसेच बस स्थानक संकुलात दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आरक्षित असलेले गाळे संबंधित लाभार्थ्यांना तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, हे मुद्देही आमदार तांबे यांनी बैठकीत ठामपणे मांडले. यासोबतच विमानतळाच्या दर्जाच्या या बस स्थानकाची नियमित व दर्जेदार स्वच्छता राखली जावी, यावरही भर देण्यात आला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या सर्व मागण्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच या विषयांवर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल, असा विश्वास आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.