छगन भुजबळ यांनी नाशकात मुहूर्तमेढ रोवलेल्या प्रवासी विमानसेवेची ‘आंतरराष्ट्रीय भरारी’

येत्या १२ सप्टेंबरपासून नाशिकमधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार

नाशिक: २३ ऑगस्ट –

नाशिकमधील ओझर विमानतळावरून येत्या १२ सप्टेंबरपासून ओझर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा श्रीगणेशा होणार आहे. ही नाशिककरांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे.

पूर्वी फक्त लष्करी व शासकीय विमान वाहतुकीसाठी उपलब्ध असणाऱ्या नाशिकमधील ओझरच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) विमानतळावरून नाशिकच्या जनतेसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी व विमानतळ विकासासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचे तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्यातूनच २ मार्च २०११ रोजी ओझर विमानतळ विकासासाठी राज्य शासन व एचएएल यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यातून या विमानतळासाठी शासनाकडून ७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, तर ‘एचएएल’ ने १० कोटी रुपये खर्च केले. जानेवारी २०१२ मध्ये या विमानतळाच्या कामाचे भूमिपूजन झाले. एकूण ८४ कोटी रुपयांतून उभारलेल्या या विमानतळाचे ३ मार्च २०१४ रोजी तत्कालीन नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्लजी पटेल यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले होते. पुढे २०१७ मध्ये एअर डेक्कन कंपनीने सेवा सुरू केली आणि नाशिक-मुंबई हे पहिले विमान या विमानतळावरून झेपावले.


या प्रवासी विमानसेवेची दशकपूर्ती नुकतीच साजरी झाली. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या विमानतळावरून २१ मे २०२४ पासून देशांतर्गत कार्गो वाहतूक सेवेचा प्रारंभी करण्यात आला आहे. आता आंतरराष्ट्रीय वाहतूकही सुरू होत आहे. ही नक्कीच आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे, अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. नाशिकची हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याने आता प्रवासी सेवेसह नाशिकमधील उद्योग, पर्यटन, कृषी, शिक्षण, व्यापार यांसह अन्य क्षेत्रांतील प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचा, विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या या विमानतळावरून नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर, गोवा आणि नागपूर या ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू आहे. आता नाशिकहून आंतरराष्ट्रीय सेवा सुरु होणार असल्याने नाशिकला सिंगापूर, बाली, श्रीलंका, थायलंड हे नवे देश जोडले जाणार आहेत. इंडिगो या विमानसेवा कंपनीकडून या देशांमध्ये जाणाऱ्या विमानांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून दररोज सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी हे विमान नाशिक येथून उड्डाण घेणार आहे. विमानांच्या तिकिटांची बुकिंग देखील सुरू झाली आहे.

या आंतरराष्ट्रीय विमानसेवेसोबतच देशांतर्गत विमानसेवेची व्याप्ती देखील वाढविण्यात येणार आहे. यात सप्टेंबरपासून जम्मू, श्रीनगर, चंदीगड, अमृतसर, वाराणसी, जयपूरसह अनेक ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. इंडिगो एअर लाईन कंपनीकडून नाशिकहून देशातील अनेक प्रमुख शहरात विमानसेवा सुरु केली जात आहे.

नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. आगामी काळातही नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी आपण अशाच पद्धतीने प्रयत्नशील राहणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.