उत्तर महाराष्ट्रात मोठी रोजगारनिर्मिती करणार
सत्यजीत तांबेंच्या आश्वासनाने तरुणांमध्ये नवी उमेद
बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्या राज्यात सध्या तरुणांना भेडसावते आहे. पण बेरोजगारीमुळे मोठ्या शहरांमध्ये होणारं स्थलांतर त्याहून भयावह आहे. लहान शहरांत, गावांत नोकरीची संधीच नसल्यामुळे मुबंई, पुण्यात स्थलांतर वाढत आहे. पण तिथेही आता स्पर्धा वाढली असून बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. यावर सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेऊन उपाय काढला आहे.
सत्यजीत तांबे हे नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार आहेत. महाराष्ट्रभरात त्यांनी संघटनेच्या माध्यमातून बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी संघर्ष केला आहे. आता विधान परिषद निवडणूकीच्या रिंगणात ते उभे असताना बेरोजगारीवर प्रशासकीय मार्गाने काम करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे.
उत्तर महाराष्ट्रात कुठेही मोठे उद्योगधंदे नसल्याने उत्तर महाराष्ट्रातील युवा मुंबई-पुण्यात जात आहे. त्यांना उत्तर महाराष्ट्रातच रोजगाराची संधी देण्यासाठी अहमदनगर, नाशिकमध्ये आयटी व ऑटोमोबाईल केंद्र उभारण्याचं मोठं आश्वासन सत्यजीत यांनी दिलं आहे. सोबतच, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मोठ्या उद्योगांना पूरक असे लघुद्योग निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.
इतकंच नाही, तर जयहिंद लोकचळवळच्या माध्यमातून ५०० उद्योजक घडवण्याचं काम सत्यजीत तांबे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या लघुद्योग व स्टार्टअपला केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे. तरुणांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठीही ते प्रयत्न करणार आहेत.
प्रत्येक कुटुंबातील तरुणाच्या हाती आपल्याच भागात रोजगार असेल, तर कोणालाही मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. सोबतच, उत्तर महाराष्ट्र उद्योगधंद्यांनी समृद्ध होईल अशी आशा सत्यजीत यांच्याकडून तरुणांना मिळत आहे.