समीर भुजबळांचा राज्यव्यापी दौरा; समता परिषदेच्या जिल्हानिहाय आढावा बैठका!

छत्रपती संभाजीनगरपासून सुरू झालेल्या बैठकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी रणनीती, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आणि संघटनबळ वाढवण्यावर भर

नाशिक १५ जुलै : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार, संघटनेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्यभरातील संघटन बळकट करण्यासाठी आढावा बैठकांची मालिका सुरू केली आहे. २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीने सुरू झालेल्या या बैठकांमध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील जिल्ह्यांमधील समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. या बैठकांमध्ये ओबीसी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना व बुलढाणा जिल्ह्यांची संयुक्त बैठक:

पहिली आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर येथे झाली, ज्यामध्ये संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी संघटनेच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकत ओबीसी समाजाच्या राजकीय आणि सामाजिक हक्कांसाठी कार्यकर्त्यांनी एकजूट दर्शवावी, असे आवाहन केले. त्यांनी या भागातील कार्यकर्त्यांना संघटनेची रचना अधिक मजबूत करण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे निर्देश दिले.

बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्यांची संयुक्त बैठक:
दुसरी महत्त्वाची बैठक बीड येथे पार पडली, ज्यामध्ये बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील समतासैनिकांनी भाग घेतला. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर खोलवर चर्चा झाली. समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले की, “स्थानिक निकायांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व वाढवणे हे आपले प्रमुख ध्येय आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर काम केले पाहिजे.” यावेळी कार्यकर्त्यांनी ओबीसी जनगणना आणि राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याची शिफारस केली.

परभणी, हिंगोली, वाशिम व नांदेड जिल्ह्यांची संयुक्त बैठक:
परभणी येथे झालेल्या बैठकीमध्ये हिंगोली, वाशिम आणि नांदेड जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी उमेदवार निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचाराची तयारी केली पाहिजे, अशी सूचना समीर भुजबळ यांनी दिली. त्यांनी म्हटले, “ओबीसी समाजाला राजकीय न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकवटून काम केले पाहिजे.

यवतमाळ, अमरावती व अकोला जिल्ह्यांची संयुक्त बैठक:
यवतमाळ येथील बैठकीत महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. समता परिषदेच्या भगिनींनी औक्षण करून समीर भुजबळ यांचे स्वागत केले. यावेळी ओबीसी समाजातील महिला नेतृत्व वाढवण्यावर भर देण्यात आला. समीर भुजबळ यांनी सांगितले, “महिला कार्यकर्ते हे आपल्या संघटनेचे मोठे स्तंभ आहेत. त्यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये अधिक सक्रिय भूमिका बजावली पाहिजे.

चंद्रपूर, नागपूर, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील बैठका:
चंद्रपूर, नागपूर, सोलापूर आणि कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि वर्धा येथील बैठकांमध्ये संघटनेच्या ताकदीवर चर्चा झाली. सोलापूरमध्ये फुले पगडी घालून समीर भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला, तर कोल्हापूरमध्ये महात्मा फुले-सावित्रीबाईंच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या सर्व बैठकांमध्ये ओबीसी आरक्षण, जातीय जनगणना आणि स्थानिक निकायांमध्ये प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मागण्यांवर जोर देण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील बैठकीद्वारे पश्चिम महाराष्ट्रातील बैठकांची सांगता:
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे झालेल्या शेवटच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक स्थितीचे विश्लेषण करण्यात आले. समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की , “आता पुढील टप्प्यात उत्तर महाराष्ट्रातील दि.१८ जुलै २०२५ रोजी जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आढावा बैठका घेणार आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आम्ही सर्वत्र आवाज उठवणार आहोत.

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी संघटनशक्ती वाढविण्याचा निर्धार:
या सर्व आढावा बैठकांद्वारे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने ओबीसी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात ही मोहीम राज्यभर पसरविण्यात येणार आहे. समीर भुजबळ यांनी आखलेला हा राज्यव्यापी दौरा आगामी काळात होणारया स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे संकेत देताना दिसत आहे, या निवडणुकांमध्ये समता परिषद संपूर्ण ताकदीनिशी ओबीसी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे, तसेच ओबीसींची एकजूट करण्यासाठी हा राज्यव्यापी दौरा महत्वाचे असल्याचे मानले जात आहे

Leave A Reply

Your email address will not be published.