राष्ट्रवादी-शिवसेना-रिपब्लिकन सेना युतीकडून नाशिकच्या भवितव्याचा महत्त्वाकांक्षी वचननामा
देशातील सर्वात स्वच्छ शहराचे लक्ष्य, सिंहस्थासाठी रिलिजियस कॉरिडॉरचा प्रस्ताव; तसेच 'तपोवनाची ओळख कायम, झाड न तोडता विकास करणार-समीर भुजबळ
नाशिक, दि. ११ जानेवारी २०२६ येणाऱ्या नगरनिगम निवडणुकीच्या पूर्वसंध्येला नाशिक शहराच्या भविष्याबद्दल एक महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणास जपणारा आराखडा सादर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्या युतीने आज एक व्यापक वचननामा जाहीर करून नाशिकला हरित आणि सुंदर बनविण्याबरोबरच देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळवण्याचे धाडसी लक्ष्य ठेवले आहे. या जाहीरनाम्याचे शिल्पकार आणि प्रमुख स्टार प्रचारक म्हणून माजी खासदार समीर भुजबळ यांनी ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ या संकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.
कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासमवेत समीर भुजबळ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा वचननामा सादर करताना एक गंभीर आणि दूरदृष्टीचा आवाज ऐकू आला. भुजबळ यांनी स्पष्ट केले की, “तपोवन ही नाशिकची खरी ओळख आहे आणि ती कायम ठेवली जाईल. झाडे न तोडता शहराचा परिपूर्ण विकास साधला जाईल. शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” त्यांनी बांबू लागवडीद्वारे पर्यावरण संवर्धनासोबतच महापालिकेचे उत्पन्नही वाढवण्याची योजना निदर्शनास आणली.
या वचननाम्यातील सर्वात ठळक बाब म्हणजे नाशिकला इंदूरच्या पाठोपाठ देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर बनवण्याचे लक्ष्य. यासाठी कचऱ्याच्या वैज्ञानिक व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. घंटागाड्यांची संख्या वाढवणे, विल्होळी येथील कचरा डेपोवर बायोडिझेल प्रकल्प सुरू करणे, स्वयंचलित स्वच्छता यंत्रे आणि मोबाईल स्वच्छतागृहांची निर्मिती या योजना आहेत. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचेही वचन दिले गेले आहे.
पर्यावरणीय संवर्धनाला या जाहीरनाम्यात विशेष स्थान देण्यात आले आहे. गोदावरी आणि नंदिनी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सीईटीपी यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणे, ‘अक्विफर मॅपिंग’द्वारे उपनद्यांना बारमाही वाहते करणे आणि नदीकाठी बांबू लागवडीद्वारे नैसर्गिक तटबंदी निर्माण करणे या मोठ्या उपक्रमांचा समावेश आहे. मोकळ्या भूखंडांवर देशी वृक्षांची लागवड करून हरितविस्ताराचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.
२०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही युतीने काही मूलभूत प्रकल्पांचे आश्वासन दिले आहे. नाशिक विमानतळावर दुसरी धावपट्टी आणि आंतरराष्ट्रीय सेवा, नाशिक-त्र्यंबकेश्वर रिलिजियस कॉरिडॉरमध्ये हवाई वाहतूक, एसटीच्या ५०० बस, ५० डबल डेकर ई-बस, त्र्यंबकेश्वरला डॉपलर वेदर रडार, २०० खाटांचे संदर्भ रुग्णालय अशा योजनांचा उल्लेख केला गेला आहे.
समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला हा जाहीरनामा केवळ निवडणूकीपूर्वीचे आश्वासन नसून शहराच्या पुढील २५ वर्षांच्या शाश्वत विकासाचा मार्गदर्शक तत्त्वज्ञान म्हणून पुढे आला आहे. ओझर, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या उपनगरांचा विचार करता एका व्यापक महानगरीय दृष्टिकोनातून हा आराखडा रचला गेला आहे. महापालिका कारभार पारदर्शक आणि ऑनलाईन करणे, आयटी पार्क स्थापन करणे, महिला बचत गटांसाठी विशेष मॉल, सहा भागात भाजीपाला मॉल, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रीडा प्रशिक्षण केंद्र, नाशिक फेस्टिव्हल यासारख्या विविध उपक्रमांनी हा वचननामा संपूर्ण शहरवासियांच्या आशा-आकांक्षांना स्पर्श करणारा झाला आहे. हा जाहीरनामा केवळ विकासाचीच नव्हे तर नाशिकच्या तपोवन असण्याच्या ऐतिहासिक ओळखीचे रक्षण करण्याचीही हमी देणारा आहे.