पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे कलाग्राम हे लवकरच निर्माण होईल -छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नाशिकमधील कलाग्रामच्या कामाची पाहणी करत , ते लवकर सुरु करण्याचे निर्देश
नाशिक,दि.२१ जून : नाशिकच्या शेतकरी, आदिवासी बांधव, बचतगट, विविध कलाकार यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी कलाग्राम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कलाग्राम अतिशय चांगलं सुव्यवस्थित राहण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येईल. पुढील काही दिवसांत कलाग्राम हे नाशिकमधील अतिशय महत्वाचे पर्यटन केंद्र होईल अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
मंत्री छगन भुजबळ यांनी आज अधिकाऱ्यांसमवेत कलग्रामच्या कामाची पाहणी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते. यावेळी पाहणी नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत कलाग्रामच्या कामाची माहिती दिली.
ते म्हणाले की, माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात दिल्ली हाटच्या धर्तीवर कलाग्राम निर्माण करण्यात आले. सन २०१४ रोजी काम पूर्ण झाले मात्र हे कलाग्राम सुरू होऊ शकले नाही. हे सुरू करण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अनेकदा दुरुस्तीसाठी पैसे आणले. मात्र प्रत्यक्षात काम सुरू होऊ शकले नाही. आता पर्यटन विभागाने पुन्हा ४.९० कोटी रुपये निधी मंजूर केला असून आता काम पूर्ण केले जात आहे. व्हिलेज संकल्पनेवर असलेल्या या कलाग्राममध्ये ९९ गाळे आहे. शेतकरी, आदिवासी बांधव, महिला बचतगट, मूर्तिकार यासह विविध कला सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी महत्वाचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
ते म्हणाले की, कलाग्राम सुरू करण्यात आल्यानंतर महालक्ष्मी सरसच्या धर्तीवर हे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना केल्या आहे. हे कलाग्राम जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून चालू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याठिकाणी हंगामानुसार वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी येथील गाळे अतिशय नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना संबंधित विभागाला करण्यात आल्या आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होऊन कलाग्राम सुरू होईल. तसेच नाशिकमधील बोट क्लब प्रमाणे हेही एक महत्वाचे पर्यटन केंद्र निर्माण होईल अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, पर्यटन विभागाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण, पर्यटन महामंडळाचे कार्यकारी अभियंता महेश बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, समाधान जेजुरकर, पी. के. जाधव,सरपंच गोविंद डंबाळे, उपसरपंच बाळासाहेब लांबे, ग्रामविकास विकास अधिकारी डी.एन.पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.