डॉ. शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसुल व राजापूर गटातील महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर उत्साहात

मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम; दृक्श्राव्य माध्यमातून मंत्री भुजबळ यांचे महिलांना मार्गदर्शन

येवला, दि. १७ फेब्रुवारी: ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला मतदारसंघातील महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी विशेष मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आज नगरसुल गटातील महिला बचतगटांसाठी सावरगाव येथील गोजराई लॉन्स येथे आणि राजापूर गटातील महिलांसाठी सायगाव येथील इंदुमाई लॉन्स येथे भव्य मार्गदर्शन शिबिरे व हळदी-कुंकू समारंभ पार पडले. या कार्यक्रमांचे नेतृत्व मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांनी केले.

या शिबिरांचा उद्देश केवळ महिलांना एकत्र आणणे नसून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, उद्योजकतेसाठी प्रेरित करणे आणि शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्यास मदत करणे हा आहे. डॉ. शेफाली भुजबळ यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांना स्पष्ट केले की, बचतगट म्हणजे केवळ कर्ज घेण्याचे साधन नसून, ते आर्थिक स्वावलंबनाचे एक शक्तिशाली व्यासपीठ आहे. “बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना उभारी देऊ,” अशी ग्वाही देताना त्यांनी महिलांनी बचतीची सवय जोपासून लघुउद्योग, व्यवसाय व कौशल्याधारित उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
यावेळी एक महत्त्वाची बाब म्हणजे, दृक्श्राव्य माध्यमातून राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बचतगटातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महिलांना योग्य प्रशिक्षण देऊन नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यांनी रायते येथे सुमारे दीड कोटी रुपये निधीतून महिलांसाठी इमारत निर्माण करून हक्काचे व्यासपीठ उभारले जात असल्याची माहिती दिली आणि मतदारसंघात इतरही ठिकाणी अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या शिबिरांचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मार्गदर्शन पुरते मर्यादित न राहता, महिलांसाठी मनोरंजनात्मक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. झी मराठी फेम अभिनेते संदीप जाधव यांनी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या धर्तीवर ‘खेळ पैठणीचा’ या खेळाचे आयोजन केले, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विविध बक्षिसे पटकावली. यामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

या कार्यक्रमांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मायावती पगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हभप तुकाराम महाराज पवार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नागेश गवळी यांनी केले.

डॉ. शेफाली भुजबळ यांनी सांगितले की, बचतगटातील महिला विविध वस्तूंचे उत्पादन करतात, परंतु योग्य मार्गदर्शन व विक्री यंत्रणा नसल्याने त्यांना योग्य बाजारपेठ मिळत नाही. ही व्यवस्था निर्माण करून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मते, हा एक सक्षमीकरणाचा महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यातून महिलांना हक्काचे व्यासपीठ तयार होईल. या शिबिरांमुळे महिलांमध्ये उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण होऊन आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या दोन्ही शिबिरांना स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या उपक्रमाचे यश सुनिश्चित केले. भुजबळ परिवाराच्या या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.