आमदार सत्यजीत तांबे यांची शब्दपूर्ती; संगमनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी निविदा प्रक्रिया सुरू!
संगमनेर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेरकरांना दिलेल्या शब्दाची पूर्तता करत आंबेडकर स्मारक उभारणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. 14 एप्रिल 2025 रोजी भव्य पूर्णाकृती स्मारक उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या आश्वासनानुसार नेमक्या एक वर्षानंतर, म्हणजे आजच, 14 एप्रिल 2026 पासून स्मारकाच्या निविदा प्रक्रियेला अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे.
सदर स्मारक उभारणीचा प्रकल्प आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून गतीने पुढे जात असून प्रशासनाच्या विविध स्तरांवर आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे नियोजनबद्ध काम सुरू असून वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
येत्या एका वर्षात म्हणजेच 14 एप्रिल 2027 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करून लोकार्पण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रस्तावित स्मारक हे संगमनेरच्या वैचारिक आणि सामाजिक अभिमानाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.