माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून येवला मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा

मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला येथील बैठकीत पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकामे यासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा; सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीलाही प्राधान्य

येवला, दि. ४ मार्च: येवला विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांची सद्यस्थिती आणि नागरिकांसमोरील समस्यांचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज येथील संपर्क कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीत मतदारसंघातील सुरू असलेली व प्रलंबित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला येवला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष कार्य अधिकारी हरीश भामरे, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, अशोक गालफाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एच.बी.चव्हाण, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

बैठकीदरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांनी नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांकडे विशेष लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी आपल्या परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, गटारव्यवस्था, वीज पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांसंबंधी विविध समस्या मांडल्या. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक समस्येचे गांभीर्याने अवलोकन करून माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. कोणतीही तक्रार प्रलंबित राहता कामा नये, याबाबत त्यांनी कटाक्षाने लक्ष घालण्याची सूचना केली.

यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले की, “येवला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांनी ज्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत, त्या केवळ सुनावणीसाठी न राहता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही व्हायला हवी. प्रत्येक विभागाने आपापल्या स्तरावर कामाची प्रगती नियमितपणे पाहावी आणि जेथे अडथळे येत आहेत, ते दूर करून कामे पूर्णत्वास न्यावीत.”

माजी खासदार समीर भुजबळ यांनी विशेषतः येवला तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू नये, यासाठी पूर्वतयारीच्या सूचना दिल्या. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि शहरातील प्रत्येक वॉर्डात पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा व्हावा आणि कुणीही पाण्यासाठी तगमगू नये, यादृष्टीने योग्य नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. विद्यमान पाणी योजनांची दुरुस्ती आणि देखभाल यावरही त्यांनी भर दिला.

येवला शहरातील कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावरही माजी खासदार समीर भुजबळ यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश देतानाच घनकचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावण्याबाबतही मार्गदर्शन केले. यासाठी स्थानिक नगरपालिका प्रशासनाने विशेष लक्ष घालून स्वच्छता यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीत चर्चा झाली. सर्व सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे आणि प्रशासनाने शांतता समितीच्या बैठका घेऊन सर्व धर्मियांच्या भावनांचा आदर राखत सण साजरे करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, शहराध्यक्ष दत्ता निकम, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार यांच्यासह नगरसेवक प्रवीण बनकर, गोटू मांजरे, जावेद लखपती, अमजद शेख, पारुल गुजराथी, बंटी परदेशी, राजेश भांडगे, अल्केश कासलीवाल, निसार लिंबूवाले, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, संजय पगार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, समाधान जेजुरकर, गणपत कांदळकर, रावसाहेब आहेर, देविदास शेळके, नितीन गायकवाड, डॉ.प्रवीण बुल्हे, भूषण लाघवे, सुमित थोरात, सचिन सोनवणे, समाधान पगारे, दीपक गायकवाड, सौरभ जगताप, देविदास निकम, विजय खैरनार, प्रवीण पहिलवान, गणेश गवळी, प्रा.संतोष राऊळ, श्रीकांत वाकचौरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या बैठकीद्वारे येवला मतदारसंघातील विकासकामांना चालना मिळणार असून नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. सर्व प्रलंबित कामांसाठी आता निश्चित कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांनी या कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.