‘फुले’च्या टीमशी छगन भुजबळांचा संवाद!

छगन भुजबळ यांनी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करत दिल्या चित्रपटाला शुभेच्छा!

मुंबई, ८ क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘फुले’ या आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी येऊन भेट घेतली. याप्रसंगी चित्रपटासंदर्भात सविस्तर संवाद झाला. याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत भुजबळ यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

याप्रसंगी भुजबळ यांच्या हस्ते ‘फुले’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी चित्रपटाच्या चमूला आपल्या निवासातील महात्मा फुले यांच्यासह महापुरुषांच्या पुतळ्याबद्दल माहिती देत त्यांच्याशी हितगुज साधले. ‘फुले’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन, निर्माते अनुया चौहान कुडेचा, निर्माते रितेश कुडेचा आणि सहनिर्माते रोहन गोडांबे यावेळी उपस्थित होते.

“कोणताही ऐतिहासिक अथवा वास्तव कथेवर आधारित चित्रपट तयार होत असताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेतच असतो. मात्र या चित्रपटात फुले दाम्पत्याचे कार्य, तत्कालीन व्यवस्थेशी संघर्ष हे सर्व अगदी वास्तव स्वरूपात दाखवण्यात आले आहे. अनेक पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच हा चित्रपट निर्माण करण्यात आला असल्याचे मत चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी व्यक्त केले.” असे त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून देशाबरोबरच जगभरातील प्रेक्षकांपर्यंत हा प्रवास पोहचणार आहे, याचा मनापासून आनंद असल्याची भावना यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केली. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते प्रतीक गांधी यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची, तर अभिनेत्री पत्रलेखा यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाईंची भूमिका साकारली आहे. तसेच प्रणय चौक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा, अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खावरे यांची संयुक्त निर्मिती असून अनंत नारायण महादेवन यांनी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी येत्या ११ एप्रिल रोजी ‘फुले’ सर्वत्र चित्रपट प्रदर्शित होत असून फुलेप्रेमी जनता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.