नाशिककरांचा कौल नम्रपणे मान्य; जनहिताच्या प्रश्नांसाठी सक्षमपणे कार्यरत राहू – समीर भुजबळ

नाशिक: नाशिक महानगरपालिका निवडणुकीत नाशिकच्या जागरूक मतदारांनी जो कौल दिला आहे, तो आम्हाला नम्रपणे मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीवर विश्वास दाखवत मतदारांनी ३० जागांचे जे बळ दिले आहे, त्याबद्दल मी तमाम नाशिककरांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली.

निवडणूक निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना समीर भुजबळ म्हणाले की, “राजकारणात जय-पराजय हे अंतिम नसतात, तर जनतेची सेवा करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत यश मिळवले आहे, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आमची युती भविष्यातही आक्रमक आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून कार्यरत राहील.”

समीर भुजबळ यांनी यावेळी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. “आमच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. जरी निकाल अपेक्षेप्रमाणे नसला, तरी लोकांच्या प्रश्नांसाठी आमचा हा ‘लोकसेवेचा यज्ञ’ यापुढेही जोमाने सुरू राहील. पाणी, रस्ते आणि नियोजित विकासकामांच्या बाबतीत आम्ही प्रशासनावर वचक ठेवून राहू,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
——
प्रतीक्रींया –
नाशिकच्या जागरूक मतदारांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्व नाशिककरांचे मनापासून आभार मानतो. ३० जागांच्या जोरावर महापालिकेत सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आमची युती काम करणार आहे. नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही आक्रमक आणि सक्षम भूमिका घेऊ. जनतेचे प्रश्न सोडवणे, शहर विकासाच्या योजनांना गती देणे आणि सामान्य नाशिककरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
— समीर भुजबळ (माजी खासदार)

Leave A Reply

Your email address will not be published.