येवल्यात नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; येवलेकरांचा पुन्हा ‘भुजबळ पॅटर्न’लाच कौल
येवला नगरपालिकेत माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला घवघवीत यश; आगामी काळात येवल्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार - माजी खासदार समीर भुजबळ
येवला, दि. २१ डिसेंबर: येवला नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शहरासाठी केलेल्या विकास कार्यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने नगराध्यक्षपदासह एकूण १४ जागांवर विजय मिळवून घवघवीत यश साजरे केले आहे. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांनी ११६५ मतांच्या आधिक्याने विजय लाभला.
हा निकाल केवळ एका स्थानिक निकालापलीकडे जाऊन येवल्याच्या राजकीय प्रवाहाचे व भुजबळ कुटुंबाच्या नेतृत्वाचे दिग्दर्शन करतो. विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांच्या निरीक्षणाखाली झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी विकास, पारदर्शकता व स्थिर नेतृत्व या मुद्द्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
समीर भुजबळांच्या रणनीतीने ठरविला विजयाचा आराखडा
राजकीय क्षेत्रात या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या ‘किंगमेकर’ भूमिकेची झाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी घेतलेल्या निर्णायक निर्णयांमुळे महायुतीचा हा विजय शक्य झाल्याचे मानले जात आहे. त्यांनी आखलेल्या बूथनिहाय रणनीती, कार्यकर्त्यांशी केलेला थेट संवाद आणि स्थानिक विकासाचेच प्रभावीपणे प्रचार केले. मंत्री छगन भुजबळ यांच्या विकास योजनांचा संदेश मतदारापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात त्यांचे योगदान निर्णायक ठरले.
या संदर्भात, विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अशा निवडणुका लोकशाहीचे प्रात्यक्षिक असून, विकासाचा मार्ग खुला करतात यावर भर दिला आहे. त्यांच्या मते, जनतेने दिलेला हा निर्णय जनहिताच्या कार्यक्रमांवरील विश्वास दर्शवितो.
भुजबळ कुटुंबाच्या नेतृत्वावरील विश्वासाची साक्ष
निवडणुकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना माजी खासदार समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीतही कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. त्यांनी यापुढील काळात येवल्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन येवल्याला ‘रोड मॉडेल शहर’ म्हणून विकसित करण्याचे आवाहन केले.
आमदार पंकज भुजबळ यांनी या विजयाला जनतेने छगन भुजबळ यांच्या विकास कार्यावर दिलेला विश्वास म्हणून स्वीकारले. त्यांनी असेही नमूद केले की, नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व इतर महायुती नगरसेवक मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या प्रगतीसाठी कटिबद्धपणे काम करतील.
महायुतीच्या विजयी उमेदवारांची यादी
या निवडणुकीत नगराध्यक्षपदी राजेंद्र लोणारी यांच्या विजयासोबतच महायुतीचे हे उमेदवार झाले विजयी….
नगरसेवक
प्रभाग क्र. १ ब – परवीन शेख (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र. ५ अ – जयाबाई जाधव (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र. ५ ब – जावेद मोमीन (लखपती) (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र. ६ अ – लक्ष्मीबाई जावळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.७ अ – प्रविण बनकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.८ अ – छाया क्षीरसागर (भाजप)
प्रभाग क्र.८ ब – दिपक लोणारी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.१० अ – पारुल गुजराथी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.१० ब – महेश काबरा (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.११ ब – कुणाल परदेशी (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.१२ अ – लक्ष्मी साबळे (भाजप)
प्रभाग क्र.१२ ब – शंकर (गोटू) मांजरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
प्रभाग क्र.१३ अ – पुष्पा गायकवाड (भाजप)
प्रभाग क्र.१३ ब – चैताली शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)
विकासाचे व्हिजन आणि आगामी आव्हाने
या विजयाने येवला शहराच्या राजकीय परिदृश्यात समीर भुजबळ यांचे वजन लक्षणीय वाढले आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, या निकालाचा परिणाम केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता, भविष्यातील विधानसभा निवडणुकांवरही होऊ शकतो. शहराचा दर्जा उंचावणे, पायाभूत सुविधांचा विकास आणि पारदर्शक प्रशासन ही आता नव्या निवडून आलेल्या प्रतिनिधींसमोरील मोठी अपेक्षा आहे. विधानपरिषद सदस्य तांबे यांसारख्या वरिष्ठ नेत्यांच्या दृष्टिकोनातून, अशा निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण व समावेशक विकास साध्य करण्याची संधी असतात.
निवडणुकीच्या अधिकृत निकालानंतर शहरभर विजयोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे येवल्याच्या भविष्यातील विकासाच्या वाटचालीवर भर दिला.