मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून नाशिकमध्ये होणार चित्रनगरी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ऐतिहासिक निर्णय; इगतपुरीतील मुंढेगावची शासकीय जागा सांस्कृतिक विभागाला देण्याचे आदेश
नाशिक, ७ ऑक्टोबर : मुंबईतील गोरेगाव चित्रनगरीप्रमाणेच आता नाशिकच्या इगतपुरीत देखील एक भव्य चित्रपटसृष्टी उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी इगतपुरीतील मुंढेगाव येथील शासकीय जमीन निवडण्यात आली असून, ती सांस्कृतिक कार्य विभागाला देण्याबाबत राज्य शासनाच्या स्तरावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या या बैठकीत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनीही सक्रिय सहभाग घेतला आणि प्रकल्पासाठीची जागा लवकरात लवकर सांस्कृतिक कार्य विभागाला हस्तांतरित करण्यासाठी जोरदार भूमिका घेतली.
उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत नाशिक येथे चित्रपटसृष्टी उभारण्यासाठीच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली. बैठकीदरम्यान असे मत व्यक्त करण्यात आले की, हा प्रकल्प नाशिक शहर आणि जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी नव्या सांस्कृतिक आणि आर्थिक संधी घेऊन येणार आहे. प्रकल्पाच्या आर्थिक सक्षमतेवर (फायनान्शिअल व्हायबिलिटी) अंतिम अहवाल सादर होण्याची वाट पाहण्यात आली असली, तरी प्रकल्पासाठी जागा ताबडतोब मंजूर करण्याच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
मंत्री छगन भुजबळ यांचा सक्रिय वाटा
या संदर्भात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरली. बैठकीदरम्यान त्यांनी प्रकल्पासाठी निवडलेली जागा लवकरात लवकर सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे इगतपुरीपासून मुंबईचे अंतर लक्षणीयरीत्या कमी झालेले असल्याने, ही जागा चित्रपटनगरीसाठी योग्य ठरते, असे त्यांनी यावेळी म्हटले. मंत्री भुजबळ यांच्या या पुढाकारामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत गती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक विभाग विकास कार्यक्रमांतर्गत वर्ष २००९ पासूनच नाशिक येथे गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर चित्रपट सृष्टी निर्माण करण्याचे मागणी शासनापुढे होती. अनेक वर्षे या प्रस्तावाला प्रत्यक्ष रूप येण्यास वेळ लागला असला, तरी आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या सक्रियतेमुळे प्रकल्पाची गाडी सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे चित्रपट निर्मिती, संगीत, कला, दिग्दर्शन यासारख्या क्षेत्रात नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राप्त झालेल्या अहवालाचे सविस्तर विश्लेषण केले. त्यांनी या प्रकल्पाची आर्थिक सक्षमता आणि तफावत यांचे विश्लेषण (गॅप अॅनालिसिस) करण्यासाठी नेमलेल्या सल्लागार संस्थेने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर, इगतपुरीतील निर्धारित जागा सांस्कृतिक कार्य विभागाला देण्याबाबतही त्यांनी ताबडतोब आदेश दिले. हे आदेश झाल्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे.
नाशिकच्या विकासाचा नवा आराखडा
नाशिक शहर आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दिशेने हा प्रकल्प एक मोठे पाऊल ठरत आहे. पर्यटन, उद्योग, संस्कृती आणि सेवा क्षेत्रात नाशिकने केलेल्या प्रगतीनंतर आता चित्रपटसृष्टीच्या क्षेत्रातही नाशिक आघाडीवर येत आहे. या प्रकल्पामुळे केवळ चित्रपटनिर्मितीच नाही, तर पर्यटनक्षेत्रालाही चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकल्पासाठी दिलेला सक्रिय पाठिंबा हा नाशिकवासियांसाठी एक मोठे साधन ठरत आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील सांस्कृतिक व आर्थिक भूदृश्य बदलण्यासाठी ही एक संधीच आहे
बैठकीत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ राजेश देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नाशिक समिती प्रमुख शाम लोंढे, दिग्दर्शक राजू फिरके, लाईन प्रोड्यूसर अमित कुलकर्णी, कला दिग्दर्शक प्रसाद राहणे, आणि फिल्म निर्माते अंबादास खैरे यांसारख्या चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या व्यक्तींनी उपस्थित राहून या ऐतिहासिक प्रकल्पासाठी पाठिंबा दर्शविला. ही उच्चस्तरीय बैठक मुंबईत झाली असली, तरी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे यात सहभाग घेतला.