नाशिक विमानतळावर पार्किंग हब करण्याची मंत्री छगन भुजबळ यांची आग्रही मागणी

रोजगार, कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या विमानतळांना इंटरलिंक करण्याच्या धोरणांतर्गत छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक, ७ ऑक्टोबर : राज्य शासनाने अलीकडेच जाहीर केलेल्या विमानतळांना इंटरलिंक करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणाचा पाठपुरावा करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील विमानतळावर विमान पार्किंग हब विकसित करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या प्रकल्पाच्या महत्त्वावर भर दिला असून कुंभमेळा २०२७ पर्वातीत या योजनेची नितांत गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.

नाशिकच्या भविष्यातील विमानवाहतूक गरजा लक्षात घेता विमानतळाची क्षमता वाढविण्यासाठी आधीच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या संदर्भात, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर असलेली नवीन धावपट्टी मंजूर केली असून त्यासाठी ३४३ कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. मंत्री भुजबळ यांच्या म्हणण्यानुसार, महाकुंभ नियोजनाअंतर्गत प्रयागराज विमानतळाचे यशस्वी आधुनिकीकरण झाले ज्यामध्ये पार्किंग बेची संख्या ४ वरून १५ पर्यंत वाढवण्यात आली. प्रयागराजचा हा अनुभव लक्षात घेता नाशिक विमानतळावर सुद्धा तत्परतेने विमान पार्किंग हब विकसित करणे गरजेचे ठरले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान पीक आवरात विमानतळावर १००० हून अधिक प्रवासी हाताळावे लागणार असल्याने अशा हबची निर्मिती अपरिहार्य आहे.

मुंबई आणि दिल्ली यांसारख्या देशातील मोठ्या विमानतळांवर जागेची तूट निर्माण झाल्यामुळे विमान कंपन्यांना त्यांची विमाने पार्किंगसाठी इतर ठिकाणी पाठवावी लागतात. यामुळे केवळ इंधन खर्चात २० ते ३० टक्क्यांइतकी वाढ होत नाही तर वेळेचा मोठा अपव्ययही होतो. मुंबई विमानतळावर एका बोईंग विमानासाठी रात्रभर पार्किंगचा खर्च दहा ते वीस हजार रुपये इतका येतो, ज्यामुळे विमान कंपन्यांच्या खांद्यावर अतिरिक्त आर्थिक ओझे पडते. या पार्श्वभूमीवर अहमदाबाद आणि गोव्यासारख्या राज्यांनी विमान पार्किंग हब विकसित करून व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या संधी निर्माण केल्या आहेत.
नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ आधीच अत्याधुनिक तांत्रिक सुविधांनी सज्ज आहे. विमानतळाच्या धावपट्टीवर लायटिंग सिस्टीम, रात्रीच्या वेळी उतरण्याची सुविधा, रडार सुविधा तसेच इतर आधुनिक सुरक्षा उपाय अस्तित्वात असल्याने हा विमानतळ चोवीस तास कार्यरत आहे. मुंबईपासून केवळ १५८ किलोमीटर हवाई अंतरावर असलेला नाशिक विमानतळ हा मुंबईसाठी एक आदर्श पार्किंग हब ठरू शकतो. कुंभमेळा २०२७ च्या नियोजनासाठी ही संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरेल. मुंबईतील विमाने पार्किंगसाठी नाशिकला वापरल्यास अतिरिक्त कनेक्टिव्हिटी निर्माण होऊन नवीन मार्गांना चालना मिळेल तसेच धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होतील.

या प्रकल्पामुळे व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. अंदाजे दहा हजारांहून अधिक लोकांसाठी रोजगार निर्मिती होऊन स्थानिक व्यवसायांना हातभार लागेल. तसेच कार्गो वाहतुकीत वाढ होऊन उद्योगधंद्यांना फायदा होईल. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक विमानतळावर हॉपिंग फ्लाइट्सची संख्या वेगाने वाढेल आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी सुलभ होईल.

या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विमानतळासाठी नवीन प्रवासी टर्मिनल, पर्यायी टॅक्सी लिंक रन-वे आणि अतिरिक्त पार्किंगसाठी १८५ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. देशातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिक विमानतळाचे हॉल्टिंग चार्जेस अत्यंत कमी आहेत तसेच विमान इंधन भरण्यावरील करही कमी आहे, ज्यामुळे विमान कंपन्यांना आकर्षित करणे सोपे जाईल. जून २०२७ पर्यंत नवीन धावपट्टी कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

एचएएलने मार्च २०२५ मध्ये नागरी विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल सेवा नाशिक येथे सुरू केली आहे. कंपनी आता दरवर्षी ए-३२० जातीच्या २० विमानांचे ओव्हरहॉल करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबई, बेंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना या पार्किंग हबकडे आकर्षित करता येईल. विमानांच्या देखभालीची सोय असल्याने विमान कंपन्यांचा पार्किंग खर्च २० ते ३० टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रात व्यक्त केलेल्या आशेप्रमाणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाच्या मागणीचा सकारात्मक विचार करून नाशिक विमानतळाच्या विकासाला गती देणारा ऐतिहासिक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.