“त्या काळ्याकुट्ट रात्रीचं सत्य पुन्हा उजेडात… तहव्वुर राणा NIA च्या ताब्यात!”
२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा याला अखेर भारतात आणण्यात आलं आहे. अमेरिकेतून विशेष विमानाने त्याला दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं असून, लवकरच त्याला राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मुख्यालयात नेण्यात येणार आहे, जिथे त्याच्यावर सखोल चौकशी होणार आहे.
NIA पथक चौकशीसाठी पूर्णतः सज्ज आहे. त्यानंतर राणाला राजधानीतील तिहार तुरुंगात हलवण्यात येईल, जिथे त्याच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त करण्यात आला आहे. या उच्च-प्रोफाइल सूत्रधाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावर सुरक्षेचा उच्चस्तरीय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषतः SWAT कमांडोची एक टीम विमानतळावर तैनात करण्यात आली आहे.
NIA मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील विशेष चौकशी कक्षात केवळ १२ अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये NIA चे महासंचालक सदानंद दाते, आयजी आशिष बत्रा आणि डीआयजी जया रॉय यांचा समावेश आहे.
राणाला NIA न्यायालयात हजर करण्यापूर्वी, पटियाला हाऊस कोर्टाच्या गेटबाहेर उपस्थित पत्रकारांची ओळखपत्रे तपासली जात आहेत. कोर्टात माध्यमांना प्रवेश बंदी आहे. तसेच, NIA मुख्यालयासमोर सामान्य नागरिकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव जवाहरलाल नेहरू मेट्रो स्टेशनचा गेट क्रमांक २ बंद करण्यात आला आहे. दक्षिण दिल्लीतल्या DCP कार्यालयाने NIA कार्यालयाच्या परिसरातील सुरक्षेची तपासणी सुरू केली आहे.