डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीच्या नगरसेवकांचा मुंबई महानगरपालिकेचा अभ्यास दौरा
मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर संगमनेरचा विकास; घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया व नागरी सुविधा केंद्राचा घेतला आढावा
मुंबई, २५ फेब्रुवारी : संगमनेर शहराच्या नियोजित विकासासाठी आणि ‘२.० व्हिजन’ संकल्पनेला गती देण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींनी आज मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांना भेट देऊन तेथील कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास केला. आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याचा आज पहिला दिवस होता. या दौऱ्यात माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे आणि नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह संगमनेर शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत.
या भेटीदरम्यान प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या ‘नागरी सुविधा केंद्र’ (CFC), ‘घनकचरा व्यवस्थापन’ आणि ‘मलनिःसारण’ (STP – Sewage Treatment Plant) या तीन महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ वॉर्ड (ग्रँड रोड) कार्यालयाला भेट देऊन तेथील प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली.
शहरातील वाढता विस्तार पाहता घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे या आघाड्यांवर मुंबईचे मॉडेल कसे उपयुक्त ठरेल, याचा अभ्यास यावेळी करण्यात आला.
तसेच, नागरिकांना एकाच छताखाली सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या नागरी सुविधा केंद्राच्या कामकाजाचीही नगरसेवकांनी पाहणी केली. आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून आयोजित या दौऱ्यामुळे संगमनेरच्या भावी प्रकल्पांना योग्य दिशा मिळणार आहे.
हा दौरा उद्याही सुरू राहणार असून, त्यामध्ये इतरही काही महत्त्वपूर्ण विभागांना भेटी दिल्या जाणार आहेत. मिळालेल्या अनुभवातून संगमनेरमध्ये अधिक सक्षम आणि नागरिकाभिमुख प्रशासन राबवण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.