उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी आमदार सत्यजीत तांबे आक्रमक!
समृद्धी महामार्ग कनेक्टर रद्दप्रकरणी सभागृहात केले गंभीर मुद्दे उपस्थित!
मुंबई, २५ फेब्रुवारी : उत्तर महाराष्ट्राला थेट जोडणी देणारा नाशिक कनेक्टर रद्द केल्याच्या मुद्द्यावर आमदार सत्यजीत तांबे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धारेवर धरले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा राज्यासाठी अभिमानाचा प्रकल्प असला तरी नाशिक व खानदेशातील नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तांबे यांनी सभागृहात मांडले की, समृद्धी महामार्ग नकाशावर जवळ असला तरी नाशिककरांना इगतपुरीपर्यंत प्रवास करावा लागतो. या प्रवासात खराब रस्ते, अतिरिक्त अंतर आणि दुहेरी टोलचा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याने प्रकल्पाचा अपेक्षित फायदा नागरिकांना मिळत नाही.
धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, सटाणा आणि कळवण या भागांतील नागरिकांनाही समृद्धी महामार्गाचा थेट लाभ मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत शासनाने ठोस योजना जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
५०० कोटींचा नाशिक कनेक्टर रद्द का? नाशिकसाठी मंजूर ५०० कोटी रुपयांचा कनेक्टर प्रकल्प रद्द का करण्यात आला, संपादित जमीन वापरात का आणली जात नाही आणि नाशिककरांना टोल सवलत देणार का? असे थेट प्रश्न त्यांनी सरकारसमोर ठेवले.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उत्तर देताना दुहेरी टोल आकारला जात नसल्याचा दावा केला. इंटरचेंजपासून प्रतिकिलोमीटर दरानेच टोल आकारला जातो, तसेच नाशिककरांसाठी ३०–५० किमी प्रवास मोठा अडथळा नसल्याचे त्यांनी नमूद केले.
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडण्यासाठी पाच इंटरचेंज उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक–इगतपुरी कनेक्टरऐवजी भरवीरमार्गे नवीन अॅक्सेस कंट्रोल रस्ता विकसित करण्याचे नियोजन सुरू असून, छत्रपती संभाजीनगर–जळगाव “खानदेश एक्सप्रेस” मार्गाचा DPR तयार असल्याची माहितीही देण्यात आली.
सरकारचे उत्तर वास्तवापासून दूर आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप करत तांबे यांनी नाशिककरांना न्याय मिळावा यासाठी तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. उत्तर महाराष्ट्राला समृद्धी महामार्गाशी प्रभावी जोडणी देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.