आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून संगमनेरच्या कवी अनंत फंदी खुल्या नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात
ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी करत नाट्यगृह स्वच्छता व सांभाळण्याचे केले आवाहन; उन्हाळी सुट्टीत 'नाट्यवाचन चळवळ' सुरू करण्याची सूचना
संगमनेर, २१ फेब्रुवारी : मराठी रंगभूमीचा परिसर आता आणखी समृद्ध होणार आहे. संगमनेर शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या कवी अनंत फंदी खुल्या नाट्यगृहाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत या नव्या रंगमंचावर मराठी नाट्यप्रयोगांचा सुवर्णकाळ सुरू होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकतीच विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या समवेत या नाट्यगृहाची सविस्तर पाहणी करून कलाकार व प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
संगमनेर शहराची सांस्कृतिक परंपरा लक्षात घेता, हे नाट्यगृह म्हणजे केवळ एक इमारत नसून ते येथील कलारसिकांच्या आस्थेचे आणि राजकीय इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. पाहणीदरम्यान, अभिनेते प्रशांत दामले यांनी संपूर्ण वास्तूची बारकाईने पाहणी करताना नाट्यगृहातील ध्वनिव्यवस्था, प्रकाशयोजना, रंगमंचाची रचना, प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आणि पर्यावरणपूरक सुविधा याबाबत समाधान व्यक्त केले. मात्र, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नाट्यगृह अधिक सक्षम कसे करता येईल, याबाबत त्यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या.
या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रशांत दामले म्हणाले, “संगमनेर हे राज्यातील एक प्रगतिशील आणि प्रबुद्ध प्रेक्षकवर्ग असलेले शहर म्हणून ओळखले जाते. येथे नाटक सादर करण्याची माझी अनेक वर्षांची इच्छा होती. बाळासाहेब थोरात यांच्या प्रोत्साहनामुळे आणि सत्यजीत तांबे यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे ती इच्छा आता लवकरच पूर्ण होताना दिसत आहे. हे नाट्यगृह सार्वजनिक मालमत्ता आहे. केवळ प्रशासन किंवा सरकारवर अवलंबून न राहता या मालमत्तेचे जतन करणे, तिची स्वच्छता राखणे आणि तिचे पावित्र्य अबाधित ठेवणे ही या शहरातील नागरिकांचीच नैतिक जबाबदारी आहे.”
त्यांनी पुढे एक महत्त्वाची सूचना करताना सांगितले की, येणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात नगर परिषदेने या नाट्यगृहात ‘नाट्यवाचन चळवळ’ सुरू करावी. यामुळे स्थानिक पातळीवर नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळेल, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल आणि संगमनेरमधून नवे लेखक, दिग्दर्शक व कलाकार घडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रशांत दामले यांचे आभार मानले आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत केले. ते म्हणाले, “बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नाट्यगृह उभे राहत आहे. विद्यमान नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वात हे काम वेगाने सुरू आहे. या वास्तूची उभारणी करताना तालुक्यातील कलाकार, नाट्यकर्मी आणि रसिक प्रेक्षकांच्या प्रत्येक सूचनेचा बारकाईने विचार केला जात आहे. लोकांच्या अपेक्षा आणि आधुनिक गरजा लक्षात घेऊन हे नाट्यगृह सुसज्ज केले जात आहे.”
आमदार तांबे यांनी विश्वास व्यक्त केला की, लवकरच प्रशांत दामले यांच्या लोकप्रिय विनोदी नाटकांचे प्रयोग या रंगमंचावर पाहायला मिळतील. संगमनेरकर रसिकांसाठी हा एक पर्वणीच ठरेल, असेही ते म्हणाले.
प्रशांत दामले यांनी यावेळी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करताना आमदार सत्यजीत तांबे यांना विनंती केली की, राज्यात नाट्यगृहांची संख्या वाढवण्यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करावा. जेणेकरून मराठी कला आणि कलाकारांना अधिक व्यासपीठे मिळतील आणि मराठी रंगभूमीचा विस्तार होईल.
या वेळी नाट्यगृह पाहणीसाठी उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे, नाट्य परिषदेचे प्रा. डॉ. संजय दळवी, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाने, नितीन अभंग, मोहसीन शेख, डॉ. सुनील चव्हाण, डॉ. रवींद्र गायकवाड, अंतनु घोडके, गणेश राजदेव यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर, नाट्यकर्मी आणि मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते. उपस्थित कलाकारांनीही या नव्या नाट्यगृहामुळे आपल्या कलाक्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संगमनेर शहराच्या मध्यभागी असलेले हे खुले नाट्यगृह सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असेल. यामुळे केवळ संगमनेर शहरच नव्हे तर परिसरातील तालुक्यांतील कलाकार आणि रसिकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. मराठी रंगभूमीचा हा नवा अध्याय लिहिला जाण्यासाठी आता सर्वांच्या नजरा या नाट्यगृहाच्या उद्घाटनाकडे लागल्या आहेत.