‘कर्मयोगी‘ पुरस्काराने ‘सह्याद्री फार्म्स‘चे विलास शिंदे सन्मानित | डॉ. पी.बी.पाटील फोरमचा ‘कर्मयोगी पुरस्कार’
ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील फोरमच्या वतीने यावर्षीचा ‘कर्मयोगी पुरस्कार’ सह्याद्री फार्म्स‘चे विलास शिंदे यांना येथील शांतिनिकेतनमध्ये फोरमचे अध्यक्ष व ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, पगडी, घोंगडी, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी शांतिनिकेतनचे माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष उत्तम कांबळे, फोरमचे विश्वस्त व संस्थेचे संचालक गौतम पाटील उपस्थित होते. पुरस्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले, सारे राजकीय आणि सामाजिक निर्णय ग्रामीण व्यवस्था अधिक भक्कम कशी होईल, याचा विचार करणारे हवेत.प्रगत महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे कलंक आहे. कृषी विद्यापीठासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असतो; पण या विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या जबाबदारीचा विचार केला जात नाही.प्रत्येकाने क्षमता, कौशल्यांचा वापर समाजासाठी केला पाहिजे. डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, शेतकऱ्यांची मुले शेतीपेक्षा राजकारणच जास्त करतात. हल्ली चांगली आणि तत्त्वनिष्ठ माणसे शोधावी लागतात.
पुरस्कार सोहळ्यात मा. विलास शिंदे यांनी व्यक्त केलेले विचार : मागील 25 वर्षात कुटुंबातील शेतीचे काही चढ उतार पाहिलेत. त्यातून शेतीतील संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने मागील 10 वर्षांपासून जे छोटसं काम केलंत. त्याची पोचपावती म्हणून त्यासाठी माझा सत्कार करुन पुरस्कार देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला. जी जबाबदारी टाकली त्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभारी आहे.
डॉ. पीबी पाटील आणि माई यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. त्यांनी जो मुल्यांचा वारसा आपल्या सगळ्यांना दिला आहे तो जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्या जबाबदारीचा मी ही आज एक भाग झालो आहे.
राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुल्यांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि त्याहीपुढे स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न केल्या. त्या सर्वांचा वारसा आपण पुढे नेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला अधिक ताकदीने कार्यरत रहावे लागणार आहे याची जाणीव या पुरस्काराच्या निमित्ताने होत आहे.
चारशे वर्षांपुर्वी भारत उद्योग व्यवसायात सर्व जगाचा केंद्रबिंदू होता. फ्रेंच, डच, ईंग्रजांसाठीचा आकर्षण केंद्र होता. शिवाजी महाराजांच्या, मुघलांच्या काळात देशाची अर्थव्यवस्था भरभराटीला आली होती. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा 23 टक्के होता. दरम्यान नंतरच्या काळात परिस्थिती बदलत गेली. ईंग्रजांच्या आक्रमणानंतर भारताचे हे स्थान घटत गेले. शेतीसह इतर व्यवसायांचे शोषण वाढत गेले. देशातील ग्रामीण भागातील स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून गेली. अर्थकारणाचे आणि व्यापाराचे केंद्र हे भारताकडून हळूहळू युरोपच्या दिशेने बदलत गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा हा अवघा 1 टक्का उरला होता.
यानंतरच्या काळात गांधीजींनी हीच स्थिती ओळखून खेड्याकडे चला हा नारा दिला. आपली पारंपारिक अर्थव्यवस्था भक्कम केल्याशिवाय देशाला पुन्हा चांगले दिवस येणार नाहीत हे त्यांनी ओळखले होते. भारताचे मागील साडे तीनशे वर्षांपासून शोषणच होत आले आहे. गतवैभव परत मिळविण्यासाठी ग्रामीण व्यवस्था भक्कम करणे हाच पर्याय असल्याचे गांधीजींना दिसत होते. गावातच उद्योग व्यवसाय उभे राहतील त्यातून गावाच्या अर्थकारणाचे चक्र गावातच फिरेल व गावे खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होतील. गावातील विषमता नष्ट होईल. असे स्वप्न गांधी आणि त्यांचे सहकारी पाहत होते. स्वातंत्र्यलढ्याकडेही ते त्यादृष्टीकोनातूनच पाहत होते. आर्थिक, राजकीय दृष्ट्या स्वतंत्र होणे आणि सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ होणे हेच उद्दीष्टं त्यांनी समोर ठेवलं होतं. या विचारांपासून प्रेरणा घेऊन स्वांतंत्र्योत्तर काळात अनेक ध्येयनिष्ठ कार्यकर्ते तयार झाले. त्यांनी देशाच्या विविध भागात सामाजिक कार्याची चळवळ उभी केली आणि बदलाचा ध्यास घेतला. देशसेवेसाठी तनमनधन देवून झोकून देऊन काम करणाऱ्यांपैकी पी बी पाटील हे होते. सांगली भागात त्यांच्यानंतरच्या काळात आर.आर.पाटील, उत्तम कांबळे यांच्यासारखी माणसे उभी राहिली.
ज्या मुल्यांना धरुन ही राजकीय, सामाजिक परिवर्तनाची वाटचाल सुरु झाली होती. ती नंतरच्या 80 च्या व 90 च्या दशकांत मंदावल्याचेच चित्र जास्त दिसून आले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नंतरच्या काळात मुल्य मागे पडू लागली आणि व्यवहार जास्त महत्वाच बनू लागला. याच दृष्टीकोनातून धोरणात्मक पातळीवर निर्णय होऊ लागला आणि त्याचे परिणाम सर्वसामान्य लोकांना भोगावे लागले. नकारात्मकता आणि सकारात्मकतेचा संघर्ष हा तसा सतत चालणारा आहे. याही वातावरणात काही माणसे उत्तम काम करुन, तेही पाय जमिनीवर ठेवून लोकांना सोबत घेऊन काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करीत आहेत.