शरद पवारांकडून तांबेंची पाठराखण, अपक्ष फॉर्म भरला तरी ते काँग्रेसचेच!
विविध नाट्यमय घडामोडींमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय! संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या या निवडणुकीला पार्श्वभूमीही तशीच आहे. ती पार्श्वभूमी म्हणजे सत्यजित तांबे यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज!
सुरुवातीला सत्यजीत तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघामधून काँग्रेसच्या तिकिटावर फॉर्म भरणार, अशी चर्चा होती. अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील काँग्रेस नेत्यांची देखील तशी इच्छा होती. त्यांनी सत्यजीत तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तबही केलं होतं. खरं तर त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे या मतदारसंघाचे गेल्या तीन टर्म प्रतिनिधित्व करत आहेत. अलीकडच्या काळात सत्यजित तांबे यांची समाज माध्यमांवर गाजलेली भाषणे आणि त्यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना संघटनेत केलेलं सुरेख काम यामुळे महाराष्ट्रभरातून अनेक युवा सहकारी त्यांच्या उमेदवारीची मागणी करत होते. ही सर्व जनभावना लक्षात घेऊन सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु पक्षातीलच काही लोकांच्या राजकारणामुळे ते काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करू शकले नाही.
काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सत्यजीत तांबे यांची पाठराखण केली. ‘सत्यजीत तांबे गेल्या पाच-सहा वर्षांपासून युवक चळवळीत चांगलं काम करत आहेत. हे काम मी आणि माझ्यासारखे जुने नेते खूप वर्षांपासून पाहत आले आहेत. युवा कार्यकर्त्याला संधी मिळाल्यामुळे जो वाद तयार झाला, खरं तर तो सामंजस्याने सोडवता आला असता पण महाराष्ट्र काँग्रेसने ते सामंजस्य दाखवलं नाही’ अशा प्रकारची प्रतिक्रिया शरद पवार साहेबांनी दिली आहे. तसेच ‘अपक्ष फॉर्म भरला असला तरी सत्यजीत हे काँग्रेसमध्येच आहेत’ असं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केलं.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या शरद पवार यांनी सत्यजीत तांबे यांची पाठराखण करणे, या गोष्टीला विशेष महत्व आहे. सत्यजीत तांबे हे काँग्रेसमध्येच आहेत हे स्पष्ट आहे आणि तसंही जर त्यांना गद्दारीच करायची असती तर त्यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असता. पण तसं काहीही घडलेलं नाही, त्यामुळे या अंतर्गत वादावर येत्या काळामध्ये समाधान निघेलच आणि सत्यजीत तांबे हे काँग्रेसमध्येच आहेत. तांबे परिवार हा काँग्रेसमध्येच आहे हे या पत्रकार परिषदेतून आणि सत्यजीत तांबे यांच्या भूमिकेमधून एकदम स्पष्ट होते.